कित्तूरचा केव्हीव्हीएस संघ विजेता
सिद्धरामेश्वर महाविद्यालय उपविजेता : आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा
बेळगाव : गोगटे पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित आरसीयू आंतरमहाविद्यालयीन महिलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत केव्हीव्हीएस कॉलेज कित्तूर संघाने सिद्धरामेश्वर महाविद्यालयाचा 2-1 असा पराभव करून आरसीयू चषक पटकाविला. या स्पर्धेत संगोळ्ळी रायण्णा महाविद्यालयाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावरती झालेल्या महिलांच्या विभागातील पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात केव्हीव्हीएस कित्तूरने संगोळी रायण्णा संघाचा 25-20, 25-21 अशा सरळ सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सिद्धरामेश्वरने राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 25-22, 25-17 अशा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
तिसऱ्या क्रमांकाच्या झालेल्या सामन्यात संगोळ्ळी रायण्णाने आरसीयू बेळगाव संघाचा 25-17, 25-19 अशा सेटमध्ये पराभव करून तिसरे स्थान पटकाविले. अंतिम सामन्यात केव्हीव्हीएस कित्तूरने सिद्धरामेश्वरचा 25-20, 20-25, 15-12 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे राणी चन्नम्मा विद्यापीठाचे क्रीडा निर्देशक डॉ. जगदीश गस्ती, गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. जालीहाळ, क्रीडा निर्देशक नम्रता अंतिलमरद आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केव्हीव्हीएस, उपविजेत्या सिद्धरामेश्वर तर तिसरा क्रमांक पटकाविलेल्या संगोळ्ळी रायण्णा संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून हर्षवर्धन शिंगाडे, शंकर कोलकार, राजू चौगुला व संतोष चिपाडी यांनी काम पाहिले.