कित्तूर किल्ल्याचा विकास साधणार
मंत्री कृष्ण भैरेगौडा : विविध विकासकामांचा शुभारंभ
बेळगाव : कित्तूर किल्ल्याच्या ऐतिहासिक अवशेषांचे जतन व्हावे, ही सर्वांची जबाबदारी आहे. या किल्ल्याचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्याची योजना आखण्यात आली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल 30 कोटीच्या अनुदानातून इलेक्ट्रॉनिक मॉडेलपार्क उभा केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी दिली आहे. कित्तूर विकास प्राधिकारण आणि पुरातत्व संग्रहालय यांच्यावतीने कित्तूर किल्ल्याच्या आवारात भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. किल्ला प्रवेशद्वार, तटबंदी आणि अवशेषांचे जतन करण्यासाठी 12.11 कोटी तर इतर कामांसाठी 2.4 कोटी निधी खर्ची घातला जाणार आहे. त्यामुळे किल्ल्याचा लवकरच कायापालट होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी बोलताना दिली. यावेळी कित्तूर कलमठ संस्थानचे राज्यगुरु माडीवाळ, राज्य योगेंद्र महास्वामीजी श्री पंचाक्षरी महास्वामीजी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, कित्तूर विकास प्राधिकारण आयुक्त, यांसह मान्यवर उपस्थित होते.