विश्वास अन् मेहनत यामुळे ‘किस्ना’ लोकप्रिय
घन:श्याम ढोलकिया यांचे मत : ‘किस्ना’ ज्वेलरीची जोरदार प्रगती : प्रत्येकाने आपला व्यवसाय चोख करण्याची आवश्यकता
प्रतिनिधी / बेळगाव
काम केल्यानेच आपले अस्तित्व अबाधित राहणार आहे. आजची वेळ, आजचा क्षण हा उत्तम असे समजून कोणत्याही कार्याची मुहूर्तमेढ रोवायला हवी. स्पर्धेच्या जगामध्ये आज परदेशी कंपन्यासुद्धा भारतात गुंतवणूक करण्यास महत्त्व देत आहेत. अशा वेळी आपण प्रत्येकाने आपला व्यवसाय चोख करावा. जितके व्यवसाय वाढतील तेवढी प्रगती होईल. आजपर्यंत हरे कृष्ण ब्रँडच्या ‘किस्ना’ या ज्वेलरी दालनाने विश्वास आणि मेहनत या दोन गुणांच्या जोरावर प्रगती केली आहे, असे विचार ‘किस्ना’चे कार्यकारी संचालक घन:श्याम ढोलकिया यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले रोड (सीटीएस क्र. 5654) येथे शुक्रवारी सकाळी ‘किस्ना’ या दालनाचा शुभारंभ घन:श्याम यांच्या हस्ते करण्यात आला. फीत कापून व दीपप्रज्वलन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी हे विचार मांडले. व्यासपीठावर विनायक जाधव, प्रमोद बुकटे, सचिन कदम व सचिन जाधव तसेच अविनाश पोतदार, देवेन चोक्सी आदी उपस्थित होते.
‘किस्ना’च्या पन्नासाव्या दालनाचे उद्घाटन
घन:श्याम म्हणाले, आज ‘किस्ना’च्या पन्नासाव्या दालनाचे उद्घाटन होत आहे. बेळगावची हवा ही महाबळेश्वरप्रमाणे प्रसन्न आहे. अशा शहरात व्यवसाय करण्यास कोणीही उत्सुकच असेल. बेळगावमध्ये आज अनेक ब्रँडच्या शोरुम्स येत आहेत. आपल्या ब्रँडचे वैशिष्ट्या टिकविण्यासाठी आपल्याला व्यवसाय विस्तार करतानाच सातत्य ठेवावे लागेल. जेव्हा सर्व चांगले लोक एकत्र येतात, तेव्हा कोणत्याही वाईट वृत्तींना तेथे थारा नसतो, हे आपण लक्षात ठेवायला हवे.
‘किस्ना’मध्ये खरेदी केल्यास चारचाकीसह विविध सवलती
‘किस्ना’ हा केवळ दागिने विक्रीचा ब्रँड नाही तर आजपर्यंत ‘किस्ना’ने सामाजिक उपक्रमही समांतरपणे चालविले आहेत. दरवर्षी वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भुकेल्यांना भोजन असे उपक्रम आम्ही राबविले आहेत. बेळगावमध्येसुद्धा वर्षभरात जेवढी विक्री होईल, तेवढी रोपे लावण्याचा आमचा मानस आहे. तर दर महिन्यामध्ये गरिबांना जेवण देण्याचा उपक्रम येथेही सुरू राहील. या शुभारंभाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरही घेण्यात आले आहे. ‘किस्ना’मध्ये खरेदी केल्यास ग्राहकांना चारचाकीसह विविध सवलती उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दागिन्यांच्या कारागिरीचे शिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांना ‘किस्ना’मध्ये शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमोद बुकटे यांनी आपण ढोलकिया कुटुंब आणि त्यांचा व्यवसाय यांचे व्हिडिओ पाहून त्यांना भेटण्याचे ठरविले. ढोलकिया कुटुंबातील प्रत्येक तरुण मुलाला 5 हजार रुपये देऊन महिनाभर बाहेर राहून स्वत:ला सिद्ध करावे लागते, हे विशेष आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपण बेळगावला ‘किस्ना’ हे दालन सुरू करण्याचे ठरविले, असे सांगितले.
प्रत्येकाने डोळसपणे गुंतवणूक करावी
देवेन यांनी पुढील दहा वर्षात प्रत्येकाचे उत्पन्न 3 ते 4 पटीने वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने डोळसपणे गुंतवणूक करावी, असे सांगितले. नितीन यांनी एका उत्तम भावनाने हे दालन सुरू केले आहे. ज्यांच्यामागे मराठी ताकद उभी राहते, ते प्रगती करतात. त्यामुळे ‘किस्ना’ बेळगावमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अविनाश पोतदार यांनी ‘किस्ना’ला शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या मार्गदर्शनाखाली दालन चालणार
सदर दालन सिद्धी विनायक जाधव, अंजली प्रमोद बुकटे, शीतल सचिन कदम, सारिका सचिन जाधव या महिलांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. या सर्वांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घन:श्याम यांना महालक्ष्मीची चांदीची प्रतिकृती भेट देण्यात आली. तर सर्व भागीदारांना भगवद्गीतेची प्रत देण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेळगाव ब्लड सेंटरच्या साहाय्याने हे शिबिर झाले. याप्रसंगी उपस्थित संजय रेवणकर (गोवा) व निशिल पोतदार (बेळगाव) यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रियेश यांनी केले.