For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kisha Bapu Bungalow: चित्रपट सृष्टीसाठी आकर्षक ठरलेला किशाबापूंचा सुप्रसिद्ध बंगला..

01:20 PM Apr 21, 2025 IST | Snehal Patil
kisha bapu bungalow  चित्रपट सृष्टीसाठी आकर्षक ठरलेला किशाबापूंचा सुप्रसिद्ध बंगला
Advertisement

गर्द झाडीतील बंगल्याचे आकर्षक बांधकाम आणि राजेशाही थाटात सजलेला व्हरांडा सर्वांना आकर्षित करतो

Advertisement

By : शहाजी पाटील

कोल्हापूर : अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाल्यामुळे किश्याबापूंचा हा बंगला प्रसिद्ध आहे. सुमारे 200 हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण या शाहूकालीन बंगल्यामध्ये झाले आहे. अनेक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शकांचे येणे-जाणे बंगल्यामध्ये झाले आहे. आजही कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील एक बस स्टॉप ‘किश्याबापूचा बंगला बस स्टॉप’ नावानेच प्रसिद्ध आहे. आजूबाजूला गर्द झाडीमध्ये बंगल्याचे आकर्षक बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीलाच असलेला मोठा व्हरांडा राजेशाही थाटाने सजवलेला आहे. त्यामुळे मराठी, हिंदी चित्रपटांचे निर्माता, दिग्दर्शकांच्या पसंतीला पडलेल्या या बंगल्यामध्ये आत्तापर्यंत सुमारे देंनशेवर मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे.

Advertisement

किश्याबापू मूळचे पोहाळे तर्फ बोरगावचे. शाहू महाराजांनी लहानपणीच त्यांना कोल्हापूरला आणले होते. शाहूराजांनी त्यांना सोनतळी तसेच नवा राजवाडा येथील घोड्यांच्या पागेमध्ये कामास ठेवले होते. त्या काळात ते घोड्याचे उत्तम ट्रेनर बनले. सोनतळीतील घोड्याच्या पागेमध्ये शर्यतीची उत्तम घोडी त्यांनी तयार केली होती. या बंगल्यामध्ये घोड्यांसमवेत किश्याबापूंचे चित्रित केलेले वेगवेगळे मोठे फोटो त्यांचा घोड्यांशी किती लळा होता, याची साक्ष देतात.

पुढे राजाराम महाराजांच्या काळात ते त्यांचे विश्वासू साथीदार बनले. याच काळात प्रिन्स शिवाजी नावाची एक शिकारी टीम होती. त्या टीमचे किश्याबापू प्रमुख होते. राजाराम महाराजांचे विश्वासू साथीदार बनल्यामुळे राजाराम महाराजांनी किश्याबापूंना सोनतळीत 30 एकर जमीन आणि घरासाठी जागा दिली होती. याच जागेमध्ये हा बंगला थाटला आहे. आज किश्याबापूंची चौथी पिढी येथे वास्तव्य करत आहे. काही निमित्ताने सोनतळी परिसरात आलेले लोक किश्याबापूचा बंगला पाहण्यासाठी उत्सुक असतात. हा बंगला पाहताना ते चित्रपटातील दृश्यांचे चित्रीकरण कुठे कसे झाले, या चर्चेत रंगत असतात.

मराठीतील अनेक दिग्दर्शकांचा चित्रिकरणासाठीचा हा आवडता बंगला होता. जुने कलाकार दादा कोंडके, निळू फुले, कुलदीप पवार, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, जयश्री गडकरींबरोबरच सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, निर्मिती सावंत, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव या कलाकारांच्या ‘कुंकू कुंकवाचा धनी’, सामना, सिंहासन, गुलछडी, दे धक्का., नटरंग अशा अनेक शंभरांवर मराठी चित्रपटांचे चित्रीकरण येथे पार पडले आहे. तसेच हिंदी चित्रपट अभिनेते दिलीप कुमार, सायराबानू, संजय दत्त, मुमताज, तनुजा, अमजद खान, अशा ज्येष्ठ अभिनेत्यांच्या राम और शाम, गोपी, जीवा अशा अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही या बंगल्यामध्ये आणि परिसरात पूर्ण झाले आहे.

‘नटरंग’मधील गाजलेले ‘वाजले की बारा...’या गाण्याचे चित्रीकरणही या बंगल्याच्या परिसरात झाले आहे. त्यामुळे दिग्दर्शक, अभिनेत्यांचा किश्याबापूच्या बंगल्याची ऋणानुबंध निर्माण झाला आहे. अनेक अभिनेते आले, तर या बंगल्यात येऊन जातात. जुन्या आठवणी सांगतात आणि काही काळ इथेच रमतात. जेजुरीचे खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या लग्नासाठी सासनकाठी घेऊन जाणे आणि नवरदेव खंडोबासाठी घोडी पुरवण्याचा मान या बंगल्यातूनच देण्याची प्रथा होती. ती आजही निरंतर सुरू आहे.

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील राजर्षी शाहू महाराजांच्या सोनतळी कॅम्पच्या पश्चिमेस, रस्त्याच्या बाजूला एक राजे-शाही वास्तू आहे. तिचे नाव, ‘किश्याबापू बंगला’. छत्रपती शाहूराजांचा सहवास लाभलेले कृष्णराव सावळाराम संकपाळ ऊर्फ ‘किश्याबापू’यांचा हा बंगला आहे. कोरीव, रेखीव दगडांनी हा दुमजली, टुमदार बंगला बांधला आहे. त्यी अंतर्गत सजावटही राजेशाही आहे. बंगल्यातील फरशी इटलीतून आणली गेली. अजूनही या फरशीची चकाकी कायम आहे. येथे राजेशाही थाटाचे फर्निचरही पाहायला मिळते. हा परिसरही राजेशाही थाटाचाच आहे. येथील निसर्गरम्य परिसरात भली मोठी बांधीव विहीर, देवदेवतांची स्थाने आहेत. येथील झाडांच्या पारावर ऐटीत बसण्याचा आनंदही घेता येतो.

किश्याबापू आणि बंगला आमच्यासाठी वरदानच

"आपल्या कर्तृत्वाने अनेक पिढ्यांचा उद्धार करणारे आमचे आजोबा किश्याबापू आणि त्यांचा बंगला आमच्यासाठी वरदानच ठरलेला आहे. या बंगल्यामुळेच अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या सहवासाचा आनंद आम्हाला मिळाला आहे."

- दीपक संकपाळ, किशाबापू संकपाळ यांचे नातू

Advertisement
Tags :

.