नामिबिया संघाच्या सल्लागारपदी कर्स्टन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीचे फलंदाज तसेच भारताच्या माजी विश्वचषक विजेत्या संघाचे प्रमुख प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची नामिबियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या क्रिकेट सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघाचे क्रेग विलियम्स प्रमुख प्रशिक्षक आहेत.
पुढील वर्षी 2026 साली भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी नामिबिया संघाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या संघाला आता कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर स्पर्धा फेब्रुवारी-मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे. 2004 साली क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर गॅरी कर्स्टन याने प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला. 2007 साली ते भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2011 साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी नामिबियाचा संघ यापूर्वी म्हणजे 2021, 2022 आणि 2024 साली पात्र ठरला होता. आता 2026 च्या स्पर्धेतही तो चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.