Ambabai Temple : ढगाच्या अडथळ्यामुळे किरणोत्सव म्हाळुंगापर्यंत
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी (बुधवारी) दक्षिणायन किरणोत्सव ५.४३ मिनिटाला देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंतच पोचली. यामुळे संपूर्ण किरणोत्सव होऊ शकला नाही. किरणोत्सवासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हजेरी लावली होती.
बुधवारी ढगांची झालर व हवेत बाष्पांचे प्रमाण जास्त असल्याने, कमी तीव्रतेच्या सोनेरी किरणांनी ५.०९ मिनिटांनी मंदिर व्दारातून सूर्यकिरणांनी प्रवेश केला. ही सुवर्ण किरणे हळूहळू पुढे सरकली. महाव्दार गेटवरील सूर्यकिरणांची तीव्रता ७२०० लक्स होती. ५.३३ वाजता पितळी उंबरठ्यावर हीच तीव्रता ४२ लक्स इतकी झाली. ही सूर्यकिरणे ५.४२ मिनिटांनी गुडघ्यापर्यंत पोचली. तर ५.४३ मिनिटांनी देवीच्या हातातील म्हाळुंगापर्यंत पोचली. सूर्य अडथळयामागे लुप्त झाल्याने, किरणे पुढे जाऊ शकली नाहीत. यानंतर आरती होऊन सोहळा पार पडला. अशी माहिती प्रा. मिलींद कारंजकर यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांची विविध भागांना भेट
बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे किरणोत्सव व अंबाबाई मंदिराच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित होते. त्यांना पूर्णपणे किरणोत्सव पाहता आला नाही. त्यांनी सुमारे तासभर मंदिरातील विविध भागांना भेट देऊन काही सूचना केल्या. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट देऊन त्यांनी सुरक्षेबाबतची माहिती घेतली. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीची पश्चिम महाराष्ट्रचे सचिव शिवराज नायकवाडे, सहाय्यक सचिव व्यवस्थापक महादेव दिंडे हे उपस्थित होते.
a