For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरण ठाकुर, डॉ. नौशाद फोर्ब्स, गायकवाड यांना डी.लिट

10:52 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरण ठाकुर  डॉ  नौशाद फोर्ब्स  गायकवाड यांना डी लिट
Advertisement

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 6 एप्रिलला पदवीदान सोहळा

Advertisement

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 40 वा पदवीप्रदान सोहळा शनिवार दि. 6 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्ब्स, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांना सन्माननीय डी. लिट (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुऊ डॉ. गीताली टिळक यांनी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी 10 वाजता टिमविच्या मुकुंदनगर येथील संकुलात हा सोहळा होईल. या आधी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने अभय फिरोदिया, डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. जयंत नारळीकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, ‘सीरम’चे संस्थापक डॉ. सायरस पूनावाला, डॉ. अभय बंग, सुहास बहुलकर, उद्योगपती संजय किर्लोस्कर, टेहरी धरण प्रकल्पाचे शिल्पकार राजीवकुमार बिष्णोई, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांना सन्माननीय डी. लिट देऊन गौरविले आहे.

  • ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्ब्स हे ‘फोर्ब्स मार्शल’चे सहअध्यक्ष असून अनंत एस्पन केंद्र या कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. ऊर्जा कार्यक्षमता व कचरा व्यवस्थापन या क्षेत्रातही त्यांची कामगिरी लक्षणीय ठरली. ‘सी.आय.ई.आर.’चे अध्यक्षपद त्यांनी 2016 मध्ये भूषविले होते. 2024 मध्ये त्यांनी सी.आय.आय. संचालित नयंता विद्यापीठाची स्थापना केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. तेथे काही काळ ते प्रशिक्षकही होते. तेथे त्यांनी विकसित देशांसाठी औद्योगिकीकरणाविषयी काही अभ्यासक्रम सुरू केले.
  • हणमंतराव रामदास गायकवाड हे भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा कंपनी असलेल्या ‘भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष आहेत. ही कंपनी सेवा सुविधा व्यवस्थापनासह औषध उत्पादन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प, कृषी क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत. ऊग्णवाहिकेची सर्वात मोठी सेवा आज बीव्हीजीकडून महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांत पुरविली जाते. एक कोटींहून अधिक नागरिकांनी आतापर्यंत या सेवेचा लाभ घेतला आहे. बीव्हीजीमार्फत गायकवाड यांनी हजारो युवकांना रोजगार मिळवून दिला.
  • किरण ठाकुर हे ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप सोसायटी लि.’ चे संस्थापक-अध्यक्ष आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक लघु आणि नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले. सर्वसामान्य व्यक्तींचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांनी लोककल्प फाऊंडेशनची स्थापना केली. पत्रकारितेबरोबरच शिक्षण क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.

22 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

Advertisement

पदवीप्रदान समारंभात 20 विद्यार्थ्यांना पीएच.डी., पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या 1046 विद्यार्थ्यांना, पदवी अभ्यासक्रमाच्या 1840 विद्यार्थ्यांना आणि कौशल्य विकास शाखेच्या 185 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल, असे कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले. या समारंभात विविध शाखांमधील 22 विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक देऊन गौरव केला जाणार आहे.

Advertisement
Tags :

.