काँग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे पदमुक्त
पक्षाच्या विचारधारेला बाधा आणल्याचा ठपका, पर्यावरण सेलच्या अध्यक्षांनी धाडले पत्र
खेड / प्रतिनिधी
काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांना पदावरून त्वरीत पदमुक्त करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण सेलचे अध्यक्ष समीर वर्तक यांनी त्यांना धाडलेल्या लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विचारधारेला बाधा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
रविवारी त्यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराची काँग्रेसच्या पर्यावरण सेल विभागाने गंभीर दखल घेतली आहे. जी काही माहिती उपलब्ध झाली आहे ती माणुसकीला काळीमाच फासणारी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे संदर्भात पदाधिकारी म्हणून अपेक्षाही पूर्ण करू शकले नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच घडलेल्या प्रकाराने पक्षाच्या विचारधारेला हानी पोहचली आहे. याचमुळे पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदावरून त्वरीत पदमुक्त करण्यात येत असल्याचे धाडलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
याबाबतची पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव मनेश राऊत व जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनाही पाठवण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.