किरण जाधवला नेमबाजीत सुवर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील डॉ. कर्नीसिंग नेमबाजी संकुलात सुरु असलेल्या 23 व्या कुमार सुरेंद्रसिंग स्मृती नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत विद्यमान राष्ट्रीय विजेता आणि भारताचा आंतरराष्ट्रीय नेमबाज किरण जाधवने सुवर्णपदक पटकाविले.
भारतीय नौदलातील किरण जाधवने पुरुषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत 251.5 गुणांची नोंद करत सुवर्णपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात विवेक शर्माने रौप्य तर विशाल सिंगने कांस्यपदक घेतले. कनिष्ठांच्या पुरुषांच्या विभागातील जेतेपद महाराष्ट्रच्या पार्थ मानेने पटकाविले. पार्थ मानेने आंध्रच्या उमा महेश मदिनेनीचा 0.1 गुणाने पराभव केला. उमा महेशने रौप्यपदक तर कर्नाटकाच्या नरेन सुरेशने कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत पुरुषांच्या एअर रायफल युवा विभागातील सुवर्णपदक अभिनव शॉने पटकाविले. या स्पर्धेतील अभिनवचे हे चौथे सुवर्णपदक आहे.