किरण जॉर्ज दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ इस्कान सिटी, कोरिया
भारताच्या किरण जॉर्जने जिगरबाज खेळ करीत येथे सुरू झालेल्या बीडब्ल्यूएफ सुपर 300 कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.
24 वर्षीय किरण जॉर्जने अडखळत सुरुवात केल्यानंतर जिगरबाज खेळ केला आणि व्हिएतनामच्या कुआन लिन कुओवर 15-21, 21-12, 21-15 अशी 57 मिनिटांच्या खेळात मात केली. किरण जॉर्ज हा एकमेव भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळत आहे. जागतिक क्रमवारीत तो 44 व्या स्थानावर असून त्याची पुढील लढत चिनी तैपेईच्या तिसऱ्या मानांकित चि यु जेनशी होईल.
किरणने येथील सामन्यात संथ सुरुवात केल्याने त्याला पहिला गेम गमवावा लागला. लिन कुओने या गेमच्या ब्रेकवेळी 11-4 अशी मोठी आघाडी घेतली होती आणि नंतर त्याने हा गेमही जिंकून किरणवर आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मात्र किरणने सलग सहा गुण घेत जोरदार सुरुवात वर्चस्व गाजविले. हा जोम कायम ठेवत त्याने हा गेम जिंकून 1-1 अशी बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये किरणने विजयी जोम कायम ठेवत गेमसह सामना जिंकून आगेकूच केली.