किरण जॉर्ज पराभूत, तरुणची आगेकूच
वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड
भारताचा बॅडमिंटनपटू किरण जॉर्जचे स्विस ओपन स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले तर युवा तरुण मन्नेपल्लीने दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. किरण जॉर्जला हाँगकाँगच्या जेसन गुणावानकडून संघर्षपूर्ण लढतीत 18-21, 21-16, 16-21 असा पराभव स्वीकारावा लागला. 70 मिनिटे ही लढत रंगली होती. भारताची पुरुष दुहेरीची जोडी हरिहरन अम्साकरुणन व एमआर अर्जुन यांनाही उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. त्यांना चिनी तैपेईच्या चेन चेंग कुआन व लिन बिंग वेई यांच्याकडून 17-21, 11-21 असा केवळ 32 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला.
24 वर्षीय तरुण मन्नेपल्ली जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानावर असून त्याने पाचव्या मानांकित केन्टा निशिमोटोविरुद्धच्या सामन्यात तो 16-21, 21-16, 7-1 असा आघाडीवर होता. पण निशिमोटोने खांद्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे तरुणला पुढील फेरीत खेळण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी मकाऊ ओपनमध्ये मन्नेपल्लीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. येथे त्याची पुढील लढत मलेशियाच्या जस्टिन होहशी होईल. महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोडला थायलंडच्या जागतिक चौथ्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगकडून 11-21, 15-21 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. मालविकाने तिच्याविरुद्ध सामने खेळले असून चारही सामने चोचुवाँगने जिंकले आहेत.