For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगडमध्ये रस्त्याच्या बाजूलाच कचर्‍याचे साम्राज्य

01:06 PM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
नंदगडमध्ये रस्त्याच्या बाजूलाच कचर्‍याचे साम्राज्य
Advertisement

दोन वेळा गांधी निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित गावातच स्वच्छतेचे धिंडवडे : ग्रा. पं. चे अक्षम्य दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/हलशी

स्वच्छतेचा आदर्श घालून देत दोनवेळा मानाच्या गांधी निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित झालेल्या नंदगड ग्राम पंचायत अंतर्गत सध्या एक अत्यंत संतापजनक आणि विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नंदगड परिसरातील हलशी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ सध्या प्लास्टिक, घरगुती उकिरडे, काचेच्या बाटल्या आणि वेगवेगळ्dया प्रकारच्या बरण्या अशा कचऱ्याचे अथांग साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्राम पंचायतीच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Advertisement

हलशी रस्त्यावरील या नाल्याचा उपयोग परिसरातील शेतकरी आपल्या शेतीसाठी आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करतात. मात्र रस्त्याच्या कडेला साचलेला हा घातक कचरा थेट नाल्याच्या पाण्यात वाहून जात आहे. प्लास्टिक आणि रासायनिक कचऱ्यातील घातक घटक पाण्यात मिसळत असल्याने, हे दूषित पाणी पिऊन जनावरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच याच पाण्याचा वापर शेतीसाठी होत असल्याने जमिनीचा पोत बिघडण्याची आणि पिकांवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुर्गंधीने नागरिक हैराण

या परिसरातून पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि तरुण  मॉर्निंग वॉकसाठी (फिरण्यासाठी) जात असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना नाहक मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून अनेकांना श्वसनाचे गंभीर आजार जडण्याची भीती आहे.

तक्रार करूनही ग्रा. पं. अधिकारी सुस्त

ज्या नंदगड गावाला स्वच्छतेसाठी दोनवेळा प्रतिष्ठेच्या गांधी निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच गावात आज स्वच्छतेचे धिंडवडे निघत आहेत. त्यामुळे हे पुरस्कार केवळ कागदोपत्रीच होते का, असा तिखट सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. नंदगड ग्राम पंचायतीकडे कचऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध आहे. तसेच कचरा गोळा करण्यासाठी गाड्या आणि आवश्यक कामगारांची फौजही तैनात आहे. सर्व यंत्रणा हाताशी असतानाही या परिसरात कचऱ्याचे ढीग का साचू दिले जात आहेत.

ग्राम पंचायतीचे याकडे दुर्लक्ष का, असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी सुस्त आहेत. स्थानिकांनी या गंभीर समस्येकडे ग्रा. पं. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले आहे. अनेकवेळा वर्तमानपत्रांतून बातम्या प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली. परंतु, कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या ग्रा.पं. अधिकाऱ्यांच्या कानावर अद्याप जाग येईनाशी झाले आहे. अधिकाऱ्यांच्या या साफ दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Advertisement
Tags :

.