For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | बेंदूरच्या दिवशी हरवलेला बैल अखेर सापडला; मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू

04:26 PM Jul 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   बेंदूरच्या दिवशी हरवलेला बैल अखेर सापडला  मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू
Advertisement

उत्तूर -बेंदूर सणाच्या दिवशी करीदरम्यान उधळून बेपत्ता झालेल्या बैलामुळे आर्दाळ गावावर चिंतेचे सावट पसरले होते. शेतकरी संजय विठ्ठल पोटे यांच्या जिवापाड जपलेल्या आणि परिसरात 'वेगाचा बादशहा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलाचा अखेर मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुखरूप शोध लागला. तब्बल चोवीस तासांच्या प्रतीक्षेनंतर बैल परतल्याने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Advertisement

बैल हरवल्यानंतर संजय पोटे, त्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रात्रभर करंबळी, जाधेवाडी, हीरलगे, उपराळे व परिसरातील शिवार पालथे घातले. एक क्षणही विश्रांती न घेता सुरू असलेल्या शोधमोहीमेमुळे प्रत्येकाच्या मनात एकच आशा होती – "आपला मुक्या जीवाचा साथीदार सुखरूप मिळावा."

अखेर मंगळवारी सायंकाळी चार वाजता उपराळे येथील एका शेतात बैल निपचित उभा असल्याचे शोध पथकाच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच संजय पोटे घटनास्थळी धावले. मालक समोर येताच रात्रभर भटकून थकलेल्या त्या मुक्या जीवाने शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. जणू आपल्या माणसाला पाहून त्याचाही जीव भांड्यात पडला होता. संजय पोटे यांनी बैलाला प्रेमाने कुरवाळत मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थित ग्रामस्थही भावूक झाले.

Advertisement

बैलाला गावात आणताच फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जयघोषात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. हरवलेला कुटुंबातील सदस्य परतल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता.

Advertisement
Tags :

.