दख्खनचा राजा जोतिबा दर्शन पूर्ववत सुरू
जोतिबा डोंगर : मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलल्याने दख्खनचा राजा जोतिबाचे दर्शन पूवर्वत सुरु झाले आहे. श्रावण षष्ठी यात्रेच्या तयारीसाठी हे संवर्धनाचे काम पुढे ढकलावे, अशी मागणी पुजारी वर्गाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. यास प्रशासनाने मान्यता दिली. यामुळे रविवार, 7 रोजी दख्खनचा राजा जोतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी केली होती. जोतिबा देवाच्या मूर्ती संवर्धनाचे काम साहाय्यक संचालक पुरातत्व विभागाकडून रविवार, 7 ते गुरुवारी 11 दरम्यान केले जाणार होते. श्रावण षष्ठींच्या तोंडावर अचानक झालेल्या या निर्णयामुळे शनिवारी मंदिर परिसरात ग्रामस्थ, पुजारीवर्ग एकत्रित जमा होऊन चर्चा केली. निवेदन तयार करून आमदार विनय कोरे व आमदार सतेज पाटील यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जोतिबाची श्रावण षष्ठी यात्रा 10 ऑगस्टला होणार आहे. त्या यात्रेच्या तयारीसाठी पुजारी वर्गाला आधीपासून तयारी करावी लागते. याचा विचार करून जोतिबा देवाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.