राजा, केवळ भक्तीने मी वश होतो
अध्याय आठवा
विश्वरूप पाहून घाबरलेल्या वरेण्याने बाप्पांना पुन्हा तुमचे सौम्य रूपंच मला आवडते ते कृपया पुन्हा धारण करा अशी विनंती केली. हे सर्व लहान मुलांच्या हट्टाप्रमाणे सुरू होतं. आधी ऊस पाहिजे मग त्याचे करवे करून पाहिजेत नंतर पुन्हा अखंड ऊस हवा. अशा प्रकारचे लहान मुलांचे हट्ट असतात पण ते कौतुकाने आईवडील पुरवतात. त्याप्रमाणे भक्ताच्या प्रेमापोटी बाप्पांच्या विश्वरूपाने सर्व ऐकून घेतले. वरेण्याची पुन्हा सौम्य रूप धारण करण्याची विनंती ऐकून ते म्हणाले,
नेदं रूपं महाबाहो मम पश्यन्त्ययोगिनऽ ।
सनकाद्या नारदाद्याऽ पश्यन्ति मदनुग्रहात् ।। 23।।
अर्थ-हे महाबाहो, जे योगी नसतात त्यांना हे माझे रूप दिसत नाही. सनक व नारद आदि केवळ माझ्या अनुग्रहामुळे हे रूप पाहतात.
विवरण-बाप्पा म्हणाले, माझे विश्वरूप पहायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. तपोबळावर उच्च पद मिळवणाऱ्या ऋषीमुनींना माझे अलौकिक असे विश्वरूप पहायची उत्कट इच्छा असते पण त्यांना ते पहायला मिळत नाही. जे मला संपूर्ण समर्पित होऊन भक्तियोगाचे आचरण करून उत्कटतेने माझी भक्ती करतात, परम विरक्त होतात, त्यांना ज्ञानचक्षूंची प्राप्ती होते आणि त्यांचा मात्र विश्वरूप दर्शनाचा मार्ग सुलभ होतो.
चतुर्वेदार्थतत्त्वज्ञाऽ सर्वशास्त्रविशारदाऽ ।
यज्ञदानतपोनिष्ठा न मे रूपं विदन्ति ते ।। 24 ।।
अर्थ-चार वेदांचे तत्व जाणणारे, सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण असलेले, यज्ञ-दान व तप यामध्ये रत असलेले देखील हे माझे विश्वरूप जाणत नाहीत.
विवरण-वेदशास्त्र संपन्न पंडितांनी किंवा यज्ञ, दान, तप करणाऱ्यांनी, कितीही प्रयत्न केला तरी त्यांना माझे विश्वरूप पाहणे दुरापास्त आहे. कारण त्यासाठी समोर दिसत असलेले जग मिथ्या आहे आणि केवळ ईश्वर खरा असून तो सर्व सृष्टी व्यापून राहिला आहे ही जाणीव झालेली असली पाहिजे. खरं तर जगाच्या खोटेपणाची, मिथ्यत्वाची जाणीव माणसाला होत असते पण मायेच्या प्रभावामुळे, जगाचे अतिशय आकर्षण त्याला वाटत असते. हे आकर्षण पूर्णपणे नष्ट झाले पाहिजे. ज्यावेळी भौतिकाचा म्हणजे समोर दिसणाऱ्या जगाचा दरवाजा बंद होतो त्यावेळी मोक्षाचे दार उघडते. मोक्ष ही एक अनुभवण्याची स्थिती आहे. आपल्या सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल नको असे जेव्हा वाटू लागेल तेव्हा आपण मोक्षस्थिती अनुभवत आहोत असे समजायला हरकत नाही. जग मिथ्या आहे हे समजणे आणि त्याबद्दलचे आकर्षण वाटणे बंद होणे ह्या दोन गोष्टींची पूर्तता झाली की मोक्षस्थिती अनुभवता येते. त्यासाठी यज्ञ, दान, तप, शास्त्राभ्यास इत्यादि गोष्टी उपयोगी पडत नाहीत. हे सगळे वाचल्यावर मोठमोठ्या ऋषिमुनींनी मोक्षस्थिती अनुभवलेली नसल्याने त्यांना विश्वरूपदर्शनाचा लाभ झाला नाही हे लक्षात येते. पुढील श्लोकात विश्वरूप म्हणाले, राजा केवळ भक्तीने मी वश होतो.
शक्योऽ हं वीक्षितुं ज्ञातुं प्रवेष्टुं भक्तिभावतऽ ।
त्यज भीतिं च मोहं च पश्य मां सौम्यरूपिणम् ।। 25।।
अर्थ-भक्तियुक्त भावनेच्या योगाने पाहणे, जाणणे व मजमध्ये लीन होणे शक्य आहे. भीती व मोह टाक आणि सौम्यरूपधारी मला पहा. वरेण्यराजा बाप्पांची निरपेक्ष भक्ती करत होता. निरपेक्ष भक्त देवाकडे काहीही मागत नाहीत. त्यामुळे त्याने कधी नव्हे ते मला विश्वरूप दाखवा अशी मागणी केल्यावर त्याच्या आग्रहाखातर बाप्पांनी त्याला दिव्यदृष्टी देऊन विश्वरूप दाखवले पण ते त्याला न झेपल्याने तो मला सौम्यरूप दाखवा म्हणून हट्ट करू लागला. बाप्पांनी त्याची अडचण जाणली आणि वरेण्याला दिलेली दिव्यदृष्टी काढून घेतली. त्यामुळे त्याला पुन्हा मायेचं जग दिसू लागलं.
क्रमश: