Kolhaur News : सर्पमित्राच्या धाडसामुळे किंग कोब्राला मिळाले जीवदान !
रघुनाथ पाटील यांच्या साहसाचे सर्वत्र कौतुक
by विजय पाटील
असळज : गगनबावडा तालुक्यातील खोकुर्ले इथे रघुनाथ पाटील (धामोडकर ) या सर्पमित्राने आपल्या जीवाची पर्वा न करता एका विशाल आणि अतिविषारी किंग कोब्रा सापाला जीवदान दिले. खोकुर्ले येथील वसंत भिवा लाड यांच्या घरात हा थरार पाहायला मिळाला.
दुपारच्या सुमारास गणेश लाड यांना घरामध्ये साप असल्याचे लक्षात आले.त्यांनी याची माहिती तात्काळ तात्काळ सर्पमित्र आर.के.पाटील धामोडकर यांना फोनवरून दिली.घरात पाहिले असता त्यांना किंग कोब्रा दिसला. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेल्या या किंग कोब्राला पाहून परिसरात एकच घबराट पसरली.
माहिती मिळताच सर्पमित्र रघुनाथ पाटील यांनी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हा साप अत्यंत आक्रमक होता आणि त्याने फणा काढून भीती निर्माण केली होती. मात्र, रघुनाथ पाटील यांनी कोणताही विलंब न लावता मोठ्या हिमतीने आणि कौशल्याने सापाला पकडण्याचे थरारक कार्य सुरू केले.अतिशय शांतपणे आणि सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून त्यांनी सापाला विशिष्ट साहाय्याने हाताळले आणि मोठ्या प्रयासाने एका सुरक्षित डब्यात बंद केले.
अथक प्रयत्नानंतर कोब्राला सुखरूप पकडण्यात आले.सर्पमित्र रघुनाथ पाटील यांनी पकडलेल्या किंग कोब्राला बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सापाला पकडल्यानंतर, या सापाला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घनदाट जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.किंग कोब्राला जीवदान मिळाल्याने स्थानिकांनी रघुनाथ पाटील यांच्या धाडसाचे आणि वन्यजीव संरक्षणातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे एक अतिविषारी आणि दुर्मिळ वन्यजीव वाचला, तसेच परिसरातील नागरिकांचा धोकाही टळला.