किंग चार्ल्सनी भावाला घरातून काढले बाहेर
‘युवराज़’ उपाधीही घेतली काढून : जेफ्री एपस्टीनशी संबंधांमुळे मोठी कारवाई
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजे चार्ल्स यांनी स्वत:चा कनिष्ठ बंधू प्रिन्स एंड्य्रूच्या विरोधात मोठी कारवाई करत त्यांची राजपुत्राची उपाधी काढून घेतली आहे. आता एंड्य्रू यांच्या नावासोबत प्रिन्स ही उपाधी जोडली जाणार नाही. याचबरोबर एंड्य्रू यांना विंडसर येथील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि यासंबंधी प्रक्रिया सुरू झाली आहे. बकिंगघम पॅलेसने याविषयी माहिती दिली आहे.
लैंगिक शोषणाचा गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबत एंड्य्रू यांच्या संबंधांमुळे राजघराण्यावर मोठा दबाव असताना किंग चार्ल्स यांनी हा निर्णय घेतला आहे. अलिकडेच किंग चार्ल्स यांना एका कार्यक्रमात एंड्य्रू यांच्यावरून सार्वजनिक स्वरुपात विरोधाला तोंड द्यावे लागले होते.
प्रिन्स एंड्य्रू यांचा विवाह सारा फर्ग्यूसनसोबत झाला होता. या दांपत्याला राजकन्या बीट्राइस आणि यूजनी या दोन कन्या आहेत. एंड्य्रू यांनी 22 वर्षांपर्यंत रॉयल नेव्हीमध्ये काम केले आहे. तसेच 1982 च्या फॉकलँड्स युद्धादरम्यान हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी माइन काउंटरमेजर शिप एचएमएस कॉटेसमोरची धुरा सांभाळली होती.
किंग चार्ल्स यांच्यावर मोठा दबाव
किंग चार्ल्स यांचा हा निर्णय आधुनिक ब्रिटिश इतिहासात राजघराण्याच्या एखाद्या सदस्याच्या विरोधात सर्वात नाट्यामय पावलांपैकी एक आहे. एंड्य्रू ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचे कनिष्ठ बंधू आणि दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे दुसरे पुत्र आहेत. मुलींच्या लैंगिक शोषणाचा गुन्हेगार जेफ्री एपस्टीनसोबत संबंधांवरून एंड्य्रू दीर्घकाळापासून वादग्रस्त ठरले आहेत. अलिकडेच वर्जीनिया गिफ्रेच्या मरणोत्तर आवृत्ती प्रकाशनानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. एंड्य्रू यांनी किशोरावस्थेत माझे लैंगिक शोषण केले होते असा आरोप वर्जीनिया ग्रिफे यांनी केला होत. ग्रिफे यांनी एप्रिल महिन्यात वयाच्या 41 व्या वर्षी आत्महत्या केली होती. तर एंड्य्रू यांन वारंवार स्वत:वर झालेले आरोप फेटाळले आहेत.
राजेपदाचे दावेदार
बकिंघम पॅलेसच्या घोषणेनंतरही एंड्य्रू हे ब्रिटिश मुकुटाच्या उत्तराधिकारी म्हणून आठवे दावेदार आहेत. हा दर्जा केवळ कायदा आणूनच हटविला जाऊ शकतो. परंतु याकरता जगभरातील राष्ट्रकूल देशांच्या सहमतीची आवश्यकता भासेल, ज्याकरता मोठा कालावधी लागणार आहे. मागील वेळी या प्रक्रियेचा वापर 1936 साली एडवर्ड आठवे यांनी राजेपद सोडल्यावर करण्यात आला होता. तर वर्जीनिया ग्रिफेच्या परिवाराने आज एका साधारण अमेरिकन परिवाराच्या साधारण अमेरिकन युवतीने स्वत:चे सत्य आणि असाधारण साहसाद्वारे एका ब्रिटिश राजकुमाराला पराभूत केल्याचे म्हटले आहे.
निवासस्थान सोडण्याची नोटीस
मागील महिन्याच्या प्रारंभी एंड्य्रू यांना ड्यूक ऑफ यॉर्कची स्वत:ची उपाधी सोडणे भाग पडले होते. किंग चार्ल्सनी आता एंड्य्रू विरोधात स्वत:च्या कारवाईला तीव्र करत त्यांच्या सर्व उपाधी काढून घेतल्या आहेत. आता त्यांना एंड्य्रू माउंटबॅटन विंडसर नावाने ओळखले जाणार आहे. एंड्य्रू यांना पश्चिम लंडनमधील विंडसर इस्टेट येथील स्वत:चा रॉयल लॉज राजवाडा सोडण्यासाठी औपचारिक नोटीस देण्यात आला आहे. एंड्य्रू आता पूर्व इंग्लंडच्या सँड्रिघम इस्टेटमध्ये पर्यायी खासगी निवास्थानात वास्तव्यास जाणार असल्याचे बकिंघम पॅलेसने वक्तव्य जारी करत म्हटले आहे.