ब्रिटनमध्ये किंग चार्ल्सच्या बंधूंना अटक
प्रिन्स अँड्य्रू यांच्यावर एपस्टीन प्रकरणात पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/लंडन
ब्रिटिश राजेशाहीसाठी गुरुवारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी किंग चार्ल्स तिसरा यांचे धाकटे बंधून माजी प्रिन्स अँड्य्रू माउंटबॅटन-विंडसर यांना अटक केली आहे. ही अटक 19 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. पूर्व इंग्लंडमधील सँडरिंगहॅम इस्टेटवर असलेल्या वुड फार्म येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले. अँड्य्रू हे दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांचे तिसरे अपत्य असून सध्या ते ब्रिटिश सिंहासनाच्या रांगेत आठव्या क्रमांकावर आहेत. जेफ्री एपस्टाईन सेक्स स्कँडलमुळे ते बराच काळ वादात अडकले होते. अँड्य्रू यांनी 22 वर्षे रॉयल नेव्हीमध्ये घालवली असून 1982 च्या फॉकलंड युद्धात हेलिकॉप्टर पायलट म्हणून काम केले होते.
नंतर त्यांनी ब्रिटन सरकारचे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूकीसाठी विशेष प्रतिनिधी म्हणूनही काम केले. आता पोलीस एपस्टीनला मदत करण्यासाठी त्यांच्या राजनैतिक प्रभावाचा वापर केला की नाही यावर तपास केला जात आहे. अँड्य्रू हे सध्या पोलीस कोठडीत असून सखोल तपास सुरू आहे. वृत्तानुसार, ब्रिटनच्या विशेष पोलिसांचे आठ साध्या वेशातील अधिकारी अँड्य्रू यांना अटक करण्यासाठी पोहोचले होते. ‘सार्वजनिक पदाचा गैरवापर’ केल्याच्या संशयावरून 66 वर्षीय नॉरफोक रहिवासी अँड्य्रू यांना अटक करण्यात आल्याची पुष्टी थेम्स व्हॅली पोलिसांनी अधिकृत निवेदनात केली. याप्रकरणी बर्कशायर आणि नॉरफोकमधील अनेक ठिकाणी पोलीस सध्या शोध घेत आहेत.
एपस्टीनला गोपनीय कागदपत्रे पुरवल्याचा गंभीर आरोप
प्रिन्स अँड्य्रू यांच्यावर दोषी ठरवलेल्या लैंगिक अत्याचार करणाऱ्या जेफ्री एपस्टीनला महत्त्वाची सरकारी आणि गोपनीय कागदपत्रे पुरवल्याचा आरोप आहे. एपस्टीनला कोणती संवेदनशील कागदपत्रे पुरवण्यात आली होती याचा तपास पोलीस आता करत आहेत. या वादांमुळे प्रिन्स अँड्य्रू यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ ही त्यांची प्रतिष्ठित पदवी सोडण्याची घोषणा केली होती.