कॉन्झर्वेटिव्हक पक्षाच्या नेतेपदी केमी बेडेनॉच
पहिल्या अश्वेत नेत्या ठरल्या : ऋषी सुनक यांनी सोडले पद
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये 14 वर्षांपर्यंत सत्तेवर राहिल्यावर निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने आता पुन्हा स्वत:ला संघटित करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. याची सुरुवात नेतृत्व परिवर्तनाने करण्यात आली आहे. कॉन्झर्वेटिव्ह पार्टीने केमी बेडेनॉच यांची स्वत:च्या नेतेपदी निवड केली आहे. बेडेनॉच यांनी दक्षिण मध्यममार्गी पक्षाच्या जवळपास 1 लाख सदस्यांकडून करण्यात आलेल्या मतदानात विरोधी उमेदवार खासदार रॉबर्ट जेनरिक यांच्यावर मात केली आहे. कुठल्याही प्रमुख ब्रिटिश राजकीय पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या अश्वेत महिला आहेत.
बेडेनॉच यांनी ऋषी सुनक यांची जागा घेतली आहे. सुनक यांच्या नेतृत्वातच जुलै महिन्यात कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा मोठा पराभव झाला होता. कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला केवळ 121 जागांवर समाधान मानावे लागले होते. 1832 नंतरचा या पक्षाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला होता.
पक्षाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणे, अर्थव्यवस्था आणि स्थलांतरितांसह प्रमुख मुद्द्यांवर लेबर पार्टीचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या धोरणातील त्रुटी समोर आणणे आणि 2029 मध्ये होणाऱ्या पुढील निवडणुकीत कॉन्झर्वेटिव्ह पार्टीला सत्तेवर आणण्याचे आव्हान नव्या नेत्यावर असणार आहे.
यापूर्वी ऋषी सुनक यांनी बुधवारी ब्रिटनच्या संसदेत विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. सुनक हे जुलै महिन्यात सार्वत्रिक निवडणुकीतील कॉन्झर्वेटिव्ह पार्टीच्या पराभवानंतर नव्या नेत्याची निवड होईपर्यंत पक्षाचे अंतरिम नेते म्हणून कार्यरत होते. दिवाळीदरम्यान मी पक्षाचा नेता झालो आणि याच सणादरम्यान मी स्वत:च्या पदाचा राजीनामा देत असल्याचे ऋषी सुनक यांनी म्हटले होते.