किमने सांगितले बॉलिवूडपासून दूर होण्याचे कारण
पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत केले होते काम
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिने चित्रपटसृष्टीपासून दूर होण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या किमने पुढे अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, 2011 नंतर तिने अभिनयापासून अंतर राखत इतर क्षेत्रांत आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. आता ती निर्मिती क्षेत्रातही उतरली असून अलिकडेच तिने आपल्या व्यावसायिक प्रवासाबद्दल आणि चित्रपटांपासून दूर जाण्याच्या निर्णयाबद्दल भाष्य केले.
मी जवळपास 10 वर्षे चित्रपटांमध्ये काम केले. एखादे काम करण्यासाठी हा पुरेसा मोठा कालावधी आहे. अनेक कलाकार आयुष्यभर अभिनय क्षेत्रात कार्यरत राहतात, मात्र, आपण त्यापैकी एक नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि नवीन गोष्टी करून पाहण्यासाठी वेगळा मार्ग निवडला असल्याचे किमने सांगितले आहे.
समाधान देणाऱ्या कामालाच प्राधान्य
किमच्या मते, नवीन गोष्टी शिकण्याची आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची प्रेरणा नेहमी मिळत राहिली. दिवसाच्या शेवटी जे काम मनाला समाधान देते, तेच आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे तिने सांगितले. या विचारातून तिने अभिनयापलिकडे जाऊन करिअरच्या वेगवेगळ्या संधी स्वीकारल्या.
हॉस्पिटॅलिटीपासून निर्मिती क्षेत्रापर्यंत प्रवास
अभिनयापासून दूर झाल्यानंतर किमने हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातून आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. या क्षेत्रात तिने सहा ते सात वर्षे काम केले. त्यानंतर तिने कंटेंट क्षेत्रात प्रवेश केला आणि पुढे टॅलेंट मॅनेजमेंटमध्येही काम केले. आता निर्माती म्हणून ती नव्या भूमिकेत कार्यरत अहे. एका क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता वेगवेगळ्या कामांचा अनुभव घेणे तिला अधिक महत्त्वाचे वाटते.
‘मोहब्बतें’मधून पदार्पण
2000 मध्ये प्रदर्शित ‘मोहब्बतें’ या चित्रपटातून किमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर तिने ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘फिदा’, ‘हे बेबी’ आणि ‘लूट’ यासारख्या चित्रपटात काम केले.
दाक्षिणात्य चित्रपटांतही उमटवली छाप
किमने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले. तेलगू चित्रपट ‘खडगम’मध्ये तिने रवी तेजासोबत भूमिका साकारली. याशिवाय अलाई, मगधीरा, अंजयनेयुलु आणि यगम यासारख्या चित्रपटातही ती दिसली.
