किम जोंग उनचे कृत्य : यांग सुंग- हो यांचा सार्वजनिक अपमान
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनने उपपंतप्रधान यांग सुंग-हो यांची हकालपट्टी केली आहे. किम ही योंगसोंग मशीन कॉम्प्लेक्समध्ये इंडस्ट्रियल प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. यावेळी किम यांनी स्वत:च्या संबोधनात यांग सोंग-हो यांच्या हकालपट्टीचा आदेश दिला. किम यांनी उपपंतप्रधानांना फटकारत अधिक वेळ होण्यापूर्वी स्वत:च्या पायांवर स्वत:च येथून निघून जा असे सुनावले.
यांग मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास पात्र नाहीत. एक बकरी गाडी खेचू शकत नाही. ही आमच्या कॅडर अपॉइंटमेंट सिस्टीममध्ये झालेली एक चूक होती. अखेर गाडी बैल खेचतो, बकरी नाही असे किम यांनी म्हटले आहे.
कामात विलंबासाठी अधिकारी जबाबदार
देशात सत्तारुढ वर्कर्स पार्टीच्या 9 व्या पार्टी काँग्रेसची तयारी सुरू असताना ही कारवाई झाली आहे. उत्तर कोरियात कुठल्याही अधिकाऱ्याला अशाप्रकारे सार्वजनिक स्वरुपात फटकारणे सामान्य बाब मानली जात नाही. यांग सुंग-हो यापूर्वी देशाचे मशीनरी उद्योग मंत्री होते. नंतर त्यांची बढती होत मशीनरी क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे उपपंतप्रधान करण्यात आले होते. यांग हे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वातही सामील होते, परंतु तेथे त्यांची भूमिका स्थायी नव्हती. किम यांनी रयोंगसेंग मशीन कॉम्प्लेक्सला आधुनिक स्वरुप देण्याच्या कामात होत असलेल्या विलंबासाठी आर्थिक धोरणाशी निगडित अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे.
मागील आठवड्यातही कारवाई
किम यांनी केलेली ही कारवाई पक्षाच्या नवव्या परिषदेपूर्वी अधिकाऱ्यांमध्ये भीती आणि शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी मागील आठवड्यात किम यांनी स्वत:च्या सुरक्षेशी निगडित वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यात सत्तारुढ पक्षाचा गार्ड ऑफिस, स्टेट अफेयर्स कशिमनचा गार्ड विभाग आणि बॉडीगार्ड कमांडच्या प्रमुखावर कारवाई केली होती.