कोल्हापुरात फोफावतेय 'किल द बेबी गर्ल'
सडक्या मानसिकतेमुळे शाहूनगरीला काळीमा
कडक शिक्षा हवी
जनजागृती करण्याची आवश्यकता
कोल्हापूर
वंशाला दिवा मुलगाच हवा, या मानसिकतेतून पुरोगामी कोल्हापुरात किल द बेबी गर्ल संकल्पना रुजत असल्याचे ठळकपणे पुढे येत आहे. याच कोल्हापूरने सेव्ह द बेबी गर्लचा देशाला नुसता संदेशच नव्हे, तर त्या जोडीला सायलेन्ट ऑब्झर्व्हर ही अत्याधुनिक यंत्रणा दिली होती. अवघ्या 15 ते 20 हजारांत गर्भातच मुलीचा जीव घोटणाऱ्या हत्या केंद्रांना हातभार लावत नाही ना, अशी शंका यावी, अशी स्थिती आहे. वंशाला दिवा या सडक्या मानसिकतेला सडकी यंत्रणा हातभार लावत असल्याचे वास्तव पुढे येत आहे. राधानगरीतील अशी केंद्रे उद्ध्वस्त केली. फुलेवाडीत छापे टाकले. कसबा बावडा परिसरात राजरोजपणे पहाटे सहा वाजल्यापासून रांगा लावून मुलगाच पाहिजे, याच मानसिकेतून सुरू असलेल्या दुकानदारीवर कारवाई कधी होणार ?
कागलसह राधानगरी, शहरातील उपनगरांचा काही ठिकाणी गर्भधारणेनंतर व पूर्वीही गर्भलिंग तपासणी हा गुन्हा असतानाही भ्रुण तपासणी करुन नको असलेला मुलीचा गर्भ नष्ट करणारी यंत्रणा राजरोजपणे सुरू असल्याचे फुलेवाडी येथे गुरूवारी केलेल्या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने जिह्यातील सर्व सोनोग्राफी मशिन्सला सायलेन्ट ऑब्झर्व्हर यंत्रणेची सक्ती केली होती. शंकास्पद सोनोग्राफी सेंटरवर भराभर छापे टाकले. देशमुखांच्या काळात गर्भलिंग निदानाला चाप बसला. मात्र, नंतरच्या काळात हाच चाप यंत्रणेसाठी पैसा मिळवून देणारी वेगळी वाट ठरल्याची चर्चा आहे. वंशाला दिवा मुलगाच हवा, ही मानसिकता यंत्रणेसाठी व बेकायदा सोनोग्राफी केंद्रासाठी पैशाची खाणच ठरत आहे. जिह्यात महिन्याला सरासरी दीडशेहून अधिक स्त्राr गर्भाची हत्या होत असल्याचा समाजसेवी संस्थांचा दावा आहे.
बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राबाबत माहिती मिळताच त्यावर कारवाई केली जाते. अशा तपासणीसाठी खास पथके तैनात आहेत. नियमित तपासणीही केली जाते. आजूबाजूला सुरू असलेल्या अशा बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रांची माहिती नागरिकांनी प्रशासनाला द्यावी. त्यांची नावे गुप्त ठेवली जातात. अशा केंद्राबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
उपचार केंद्र नव्हे हत्या केंद्र
मुलगाच होणार, याची खात्री व उपचारासाठी कोल्हापूरातील एक उपनगर प्रसिध्दीस येत आहे. या केंद्रातून मुलगाच होणार, याची खात्री नव्हे तर हमीच दिली जाते. या केंद्रात सामान्यपणे पहिल्या काही महिन्यात बाळाची स्थिती तपासण्याच्या नावाखाली कायद्याच्या चौकटीत सोनोग्राफी वापरली जाते. स्त्राr गर्भ असल्याचे निदान झाल्यास शक्यतो औषधाने गर्भपात केला जातो. ठराविक मुदतीच्या पुढे गर्भधारणा गेल्यास खास केंद्रात नेऊन गर्भपाताचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. यासाठी 25 हजारांपर्यंत खर्च घेतला जातो.
तपासणीतून मुलगा असल्याचे समजल्यानंतर वंशाच्या दिव्याची हमी खुद्द डॉक्टरच छातीठोकपणे देतात. परिणामी दांपत्येही हात सैल सोडतात. संबंधितांची आर्थिक पिळवणूक सुरू होते. नंतर गर्भधारणेशी काहीही संबंध नसलेल्या महागड्या शक्तिवर्धक औषधांचा त्या महिलेवर भडीमार केला जातो. वेळोवेळी अकारण महागड्या तपासण्या केल्या जातात. ही सर्व औषधे व तपासणी ठराविक ठिकाणी उपलब्ध असते. अशा उपचार पध्दतीने मुलगा झालेली दांपत्ये पुढे आयुष्यभर या दवाखान्याची जाहीरात करत या दवाखान्यात ग्राहकांची रांग उभी करतात. तर स्त्राr अर्भकाचा गर्भपात केलेली जोडपी नेक्स्ट टाईम म्हणून वेटींगला थांबतात. हमखास मुलगाच होणार, याची खात्री देत, राजरोजपणे सुरु असलेल्या या हत्या केंद्राची माहिती देण्यासाठी तक्रारदार पुढे येत नसल्याचे कारण सांगत यंत्रणा मात्र, हातावर हात ठेवून आहे.
मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरूषाच्या बिजावर (क्रोमोझोन) अवलंबून असते. एक्स-एक्स बीज स्त्राrमध्ये तर एक्स-वाय बीज पुरूषांमध्ये असते. एक्स-एक्स बीज एकत्र आले तर मुलगी होते. तर वाय-एक्स बीज एकत्र आल्यास मुलगा होतो. कृत्रिमरित्या बिजे एकत्र आणण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मुलगाच पाहिजे या हठ्ठापाई लोक चुकीच्या औषध पध्दतीला भुलतात. त्यानंतर बेकायदा गर्भ लिंग निदान केंद्राचा आधार घेत असल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
शिक्षण आणि जन्मदर दोन्हीतही मागे
जिह्यात 15 वर्षापूर्वी दर हजारी मुलांमागे 839 हे मुलींच्या प्रमाणात वाढ होऊन तो जन्मदर 893 पोहोचल्याचे शुभ संकेत आहेत. शहरी भागात शिक्षणात 92.84 टक्के पुरूष तर 83.58 टक्के महिलांचे प्रमाण आहे. ग्रामीण भागात हेच प्रमाण 86.75 टक्के पुरूष तर फक्त 69.37 टक्के महिलांचे आहे. वंशाचा दिवा या संकुचित मानसिकतेमुळे राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगामित्व व छत्रपती ताराराणीच्या शौर्यगाथेचे गोडवे गाणारे कोल्हापूर मात्र मुलींच्या जन्मदर व शिक्षणाबाबत शेवटच्या बाकावरच आहे.
लक्ष्मीकांत देशमुख (माजी वरिष्ठ सनदी अधिकारी)
कायद्याची पळवाट काढून स्त्राr बिजाची हत्या केली जाते. सायलेंट ऑब्जर्व्हर ही नुसती यंत्रणा बसवून उपयोग नाही. तर त्यासाठी प्रभावीपणे काम करणारी शासकीय यंत्रणाही हवी. नियमित तपासण्या, स्टिंग ऑपरेशन, अवैध आढळल्यास कायद्याच्या चौकटीत कडक शिक्षा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जनजागृती आदी मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. दुदैर्वाने असे घडत नसल्याचे वास्तव आहे.