खासगी सावकारकीतून मुलाचे अपहरण
सरपंचासह ५ सावकारांवर गुन्हा दाखल
पैसे परत देवूनही अधिकच्या रक्कमेसाठी जीवे ठार मारण्याची धमकी
कोल्हापूर
खासगी सावकारकीतून घेतलेल्या पैश्याची परतफेड करुनही अधिकच्या रक्कमेसाठी तगादा लावून मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये एका विद्यमान सरपंचाचाही समावेश आहे. अशोक राजाराम पाटील, अवधुत अशोक पाटील (दोघे ही रा. कळे ता. पन्हाळा), प्रल्हाद संपतराव भोसले, प्रदीप मधुकर भोसले, सरपंच मानसिंग भोसले (रा. आसगांव ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विठ्ठल आनंदा पाटील (वय ४४ रा. आकुर्डे ता. पन्हाळा) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल पाटील यांचा इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. त्यांनी अशोक पाटील याच्याकडून तीन वर्षापूर्वी ५ लाख रुपये घेतले होते. ५ लाख रुपयांच्या मोबदल्यात विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यास २९ लाख रुपयांची परतफेड केली होती. मात्र तरीही अशोक पाटील व त्याचा मुलगा अवधुत याने विठ्ठल पाटील याच्याकडे आणखी १६ लाख रुपयांसाठी तगादा लावला. १६ लाख रुपये दे नाहीतर तुला ठार मारतो, तुझी जमीन नावावर करतो अशी धमकी दिली. यानंतर विठ्ठल पाटील यांनी याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस दलाकडे दिला. यानंतर अशोक व अवधुत पाटील यांनी विठ्ठल पाटील यांना २७ लाख रुपये देण्याचे कबूल केले. ऑनलाईन पद्धतीने विठ्ठल पाटील यांच्या खात्यावर ही रक्कमही पाठवली. मात्र यानंतर १ महिन्याचा कालावधी होवून गेल्यानंतर अशोक पाटील, अवधूत पाटील प्रल्हाद भोसले, प्रदीप भोसले, सरपंच मानसिंग भोसले या पाच जणांनी विठ्ठल पाटील यांच्याकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. विठ्ठल पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विठ्ठल पाटील यांच्या मुलाचे अपहरण करुन मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या विठ्ठल पाटील यांनी २७ लाख रुपयांची रक्कम पुन्हा अशोक पाटील व त्यांच्या अन्य साथीदारांच्या खात्यावर वर्ग केली. यामुळे घाबरलेल्या विठ्ठल पाटील व त्यांच्या कुटूंबियांनी ६ महिन्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून याबाबत गुन्हा दाखल केला.
अटकपूर्व जामिन घेणारच
अशोक पाटील व त्याचा मुलगा अवधूत आणि इतर साथीदार यांची कळे, बाजारभोगांव परिसरात मोठी दहशत आहे. अनेक हातावरचे पोट असणाऱ्या कुटूंबाना आर्थिक मदतीचा दिखावा करुन आपल्या सावकारकीच्या पाशात ओढले आहे. पहिल्यांदा ठरल्या प्रमाणे व्याज घेणे आणि नंतर १५ ते २० टक्क्याने व्याज उकळण्याचा धंदा जोरात सुरु आहे. अशोक पाटील याच्या मालकीच्या जागेतच कळे पोलीस स्टेशनची इमारत असल्यामुळे अशोक पाटील यांची या परिसरात दहशत आहे. त्याच्या सोबत असणाऱ्या ४ जणांचीही अशीच दहशत आहे. गुन्हा दाखल झाला तरी आमचे काहीही होत नाही, आम्ही अटकपूर्व जामिन अर्ज घेणारच अशा अर्विभावात गुन्हा दाखल झालेले ५ ही सावकार फिरत आहेत.
पाटील कुटूंबिय ६ महिने दहशतीखाली
विठ्ठल पाटील यांना २७ लाख रुपये परत केल्यानंतर महिनाभर शांत राहिलेल्या सावकारांनी विठ्ठल पाटील याच्या मुलग्याचे अपहरण केले. त्याला ठार मारण्याची धमकी देत २७ लाख रुपयांची रक्कम परत करुन घेतली. यामुळे या सावकारांच्या दहशतीखाली असणाऱ्या पाटील कुटुंबियांनी पुन्हा पोलीसांकडे दाद मागितली.