नेहरुनगरमधील बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न?
चॉकलेटचे आमिष दाखवून एक किलोमीटरपर्यंत नेले
बेळगाव : चॉकलेटचे आमिष दाखवून नेहरुनगर येथील एका बालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. वाढत्या घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटनांपाठोपाठ आता लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीनेही पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे. नेहरुनगर येथील एका 7 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला आहे. 9 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. घरासमोर खेळणाऱ्या मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. प्रसंगावधान राखून त्या बालकाने अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आहे. घटनेनंतर चार दिवसांनी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे. घरासमोर खेळणाऱ्या बालकाला गाठून दोघा जणांनी आमच्यासोबत ये तुला चॉकलेट देतो, असे सांगितले. चॉकलेटच्या आशेने बालक तब्बल एक किलोमीटरपर्यंत त्या दोघा अज्ञातांच्या बरोबर गेला. चॉकलेटचे आमिष दाखवणाऱ्या या दोघा जणांनी मात्र त्याला चॉकलेट दिले नाही.
खूप उशिरापर्यंत चालत जाऊनही चॉकलेट मिळाले नाही म्हणून त्या बालकाने आता आपण घरी जातो, असे अपहरणकर्त्यांना सांगितले. त्यांनी त्याला सोडले नाही. म्हणून त्यांच्या हाताला नखाने ओरबाडून त्याने आपली सुटका करून घेतली. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतलेला बालक शेवटी आरटीओ सर्कलजवळ सापडला. काही नागरिकांनी या बालकाला मार्केट पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्या वडिलांना माहिती देऊन त्यांच्यासोबत बालकाला पाठवून दिले. प्रत्यक्षात माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली असून मार्केट किंवा माळमारुती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला नाही. पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता घटना घडली आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र, कुटुंबीयांनी फिर्याद दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.