मणिपूरमध्ये अपहृत पोलीस अधिकाऱ्याला वाचविले
सुरक्षादलांना मिळाले यश : मैतेई संघटनेने केले होते अपहरण
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये मंगळवारी अपहरण झालेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित मायेंगबाम यांची पोलीस आणि सुरक्षा दलांनी मुक्तता करविली आहे. मैतेई संघटना अरामर्बा तेंगगोलच्या कॅडरने त्यांचे अपहरण केले होते. इंफाळ पूर्वमध्ये ही घटना मंगळवारी संध्याकाळी सुमारे 6.20 वाजता घडली होती.
उग्रवाद्यांच्या तावडीतून मुक्तता करविण्यात आल्यावर अमित यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. इंफाळ पूर्वमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले आहे. या भागात आसाम रायफल्सच्या 4 तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे.
मैतेई संघटनेच्या काही सदस्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित यांच्या घरी मंगळवारी संध्याकाळी हल्ला केला होता. यादरम्यान सुरक्षारक्षक आणि उग्रवादी यांच्यात गोळीबारही झाला होता. या गोळीबारामुळे 4 वाहनांचे नुकसान झाले आहे. तर गोळीबारानंतर मैतेई संघटनेच्या सदस्यांनी अमित यांचे अपहरण केले होते.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित यांनी काही दिवसांपूर्वी वाहनचोरीच्या आरोपाप्रकरणी मैतेई संघटना अरामबाई तेंगगोलच्या 6 सदस्यांना अटक केली होती. यानंतर संघटनेने स्वत:च्या सदस्यांच्या मुक्ततेसाठी निदर्शने देखील केली होती.
राज्यात जातीय तणाव दूर करण्यासाठी शांतता पुढाकार हाती घेण्यात आला आहे. आता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा दलांना तैनात करण्यात येणार असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी अलिकडेच म्हटले होते.