शेअरमध्ये गुंतविलेले पैसे बुडल्याने एकाचे अपहरण : पिस्तुल लावून धमकी
दीड कोटी रूपयांची मागणी : जयसिंगपूर येथील सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल
सांगली
शेअर मार्केटमध्ये गुंतविलेले आणि बुडालेले एक कोटी ६० लाख रुपयांची मागणी करत शहरातील एका शेअर ट्रेडर्सचा व्यवसाय करणाऱ्याचे अपहरण करण्यात आले. त्यास लाकडी दांडक्याने आणि पिस्तुलाने मारहाण करण्यात येवून बुडालेल्या पैशाची मागणी करत पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा अपहरणाचा प्रकार शनिवार दि. २२ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील आणि जयसिंगपूर येथील एका हॉटेलच्या परिसरात घडला. याबाबत अपहरण झालेल्या अंजुम जहाँगिर लांडगे (४८ . ओंकार अपार्टमेंट, लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अपहरण करणाऱ्या आणि पिस्तुलचा धाक दाखवून धमकी देणाऱ्या सहा ते सात जणांविरूध्द सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनंतर पोलिसांनी फैजल डांगे, रफिक डांगे, मुज्जलिम डांगे, बबलू डांगे (सर्व रा. जयसिंगपूर), सोहेल इनामदार, अलिम पठाण यांच्यासह अन्य तीन अनोळखी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी अंजुम लांडगे यांचा शेअर्स ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. संशयित सोहेल इनामदार, अलिम पठाण आणि अन्य चौघांनी फिर्यादी अंजुम यांना शहरातील ओ -नेस्ट नावाच्या हॉटेलसमोऊन पिस्तुलचा धाक दाखवित जबरदस्तीने एका चारचाकीमध्ये बसवले. त्यांना जयसिंगपूर येथील डायमंड हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका खोलीत आणले. तेथे संशयितांनी फिर्यादी अंजुम लांडगे यांना आमचे बुडालेले एक कोटी ६० लाख रुपयांची मागणी केली. यामध्ये टाळाटाळ केल्यास पिस्तुल लावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. संशयित फैजल याने आम्हाला तात्काळ २५ लाख ऊपये देण्याची मागणी केली. संशयित सोहेल याने फिर्यादी अंजुम यांच्या मोबाईलच्या माध्यमातून एक हजार रुपये आणि ३० हजार रुपयांचे युएसडी कोणत्या तरी अकाऊंटवर ट्रान्सफर केले. प्रत्येक महिन्याला एक लाख ऊपये देण्यास सांगितले. जर हे पैसे दिले नाही तर तुला सोडणार नाही अशी धमकी त्यांना दिली. संशयितांनी फिर्यादी अंजुम लांडगे यास सांगलीत आणून सोडले आणि त्याची दुचाकी जबदरस्तीने घेवून गेले. ही माहिती अंजुम यांनी त्यांच्या कुंटुंबियांना सांगितली. कुंटुंबियांनी तात्काळ याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितल्यानंतर पोलीसांकडे या सहा ते सात जणांविरूध्द लांडगे यांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. याचा अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.