किदांबी, तन्वी यांची विजयी सलामी
देविका सिहाग, लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात
वृत्तसंस्था/शेन्झेन (चीन)
चीनमध्ये सुरू असलेल्या चायना मास्टर्स स्पर्धेत बुधवारी भारतीय शटलर किदांबी श्रीकांत आणि तन्वी शर्मा यांनी एकेरीच्या सामन्यांत विजय मिळविला. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदांबीने ची यु जेनचा 21-16, 21-15 असा पराभव केला. महिला एकेरीत 17 वर्षीय आणि वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती असलेल्या तन्वीने जागतिक क्रमवारीत 40 व्या स्थानावर असलेल्या अमाली शुल्झचा 21-16, 21-17 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. मिश्र दुहेरीतही भारताने चांगली कामगिरी केली. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीने पहिल्या फेरीत टोनकिड साहेन्ग व टोनरुग साहेन्ग यांच्यावर 21-18, 21-9 असा विजय मिळवला.
मात्र विजेतेपदासाठी भारताची मोठी आशा मानल्या जाणाऱ्या आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या तसेच 2024 ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरी गाठणाऱ्या लक्ष्य सेनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. त्याला व्हिक्टर लाईकडून 14-21, 7-21 असा पराभव पत्करावा लागला. सामन्यात जसजशी प्रगती झाली तसतसा हा सामना त्याच्या हातातून निसटत गेला. तसेच महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत देविका सिहागचाही कालोयाना नालाबंतोव्हाकडून 18-21, 15-21 असा पराभव झाला. भारताची उदयोन्मुख शटलर उन्नती हुडाचे चायना मास्टर्समधील आव्हान पहिल्या फेरीतच संपले. मंगळवारी शेन्झेन येथे झालेल्या महिला एकेरीच्या सलामीच्या सामन्यात तिला जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या किम गा युनकडून पराभव स्वीकारावा लागला.