किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / कॅलगेरी (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कॅनडा खुल्या सुपर 300 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विभागात भारताच्या किदांबी श्रीकांतने आपली विजय घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याने चीन तैपेईच्या टॉपसिडेड चोयु चेनचा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत किदांबी श्रीकांतने चेनचा 21-18, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या मे महिन्यात किदांबी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. श्रीकांतचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या तृतिय मानांकित केंटा निशीमोटोशी होणार आहे. दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या निशीमोटोने भारताच्या एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमणियनचा 21-15, 5-21, 21-17 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. हा सामना 80 मिनिटे चालला होता. महिला एकेरीतील भारताचे आव्हान वलीशेट्टीच्या पराभवाने संपुष्टात आले. डेन्मार्कच्या अॅमिली शुल्झ वलीशेट्टीचा पराभव केला. 240, 000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आता किदांबी श्रीकांतचे आव्हान जीवंत राहिले आहे.