कियाची पीव्ही 7 इलेक्ट्रीक व्हॅन लवकरच होणार लाँच
जागतिक स्तरावर गाडी लाँच : 11 सीटरची असणार गाडी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी किया इंडिया येत्या काळात आपली नवी 11 सीटरची इलेक्ट्रीक व्हॅन सादर करण्याची शक्यता आहे. पीव्ही 7 या नावाने ही नवी गाडी बाजारात कंपनीकडून उतरवली जाणार असल्याचे समजते. सदरची ही नवी गाडी जागतिक स्तरावर 16 सप्टेंबरला सादर करण्यात आली आहे. पीव्ही सिरीजअंतर्गतची कंपनीची दुसरी इलेक्ट्रीक व्हॅन आहे. याआधी कंपनीची पीव्ही 5 ही गाडी सादर करण्यात आली होती. पीव्ही 7 ही गाडी प्रवासी व कार्गो या दोन मॉडेलससह सादर केली जाणार आहे. पीव्ही 7 ही गाडी 2027 च्या दुसऱ्या सहामाहीत सर्वात आधी दक्षिण कोरीया व युरोपातील बाजारात लाँच केली जाणार आहे. भारतात ही गाडी कधी लाँच केली जाणार आहे याबाबत मात्र कंपनीने खुलासा केलेला नाही.
दोन प्रकार, विविध वैशिष्ठ्यो
पीव्ही 7 ची निर्मिती कमर्शियल व पॅसेंजर या दोन्हीचा विचार करुन करण्यात आली आहे. यात फ्रंट माऊंटेड इलेक्ट्रीक मोटर दिली असून 368 एचपीची ऊर्जा देते. इलेक्ट्रीक व्हॅन 460 किमी अंतर मायलेज देऊ शकते. सुरुवातीला ही गाडी फ्रंट व्हील ड्राइव्ह सेटअपसह येईल व नंतर ऑल व्हील ड्राइव्ह पर्याय एडब्ल्यूडीसह येईल. लक्षात घ्या की गाडीत 350 केडब्ल्यू डीसी फास्ट चार्जर असणार असून बॅटरी 10 ते 80 टक्के इतकी चार्ज होण्याकरीता 20 मिनीटे लागणार आहेत. गाडीचे डिझाइन हे पीव्ही 5 शी मिळतेजुळते आहे. पण पीव्ही 7 चा आकार मोठा आहे. याची लांबी 5350 एमएम, रुंदी 1995 एमएम व उंची 1990 एमएम इतकी असणार आहे. समोर एलईडी हेडलाइटस, ब्लॅक ग्रिल व सिल्वर डिटेलिंग दिले गेले आहे. सी आकाराचे एलईडी डे टाइम रनिंग लाइटस गाडीला नवा लुक प्रदान करतात. दोन्ही प्रकारात स्लायडिंग डोर मिळणार आहे.
किती सीटर
पॅसेंजर प्रकारात लिफ्ट अप टेलगेट दिले जाईल तर कार्गो प्रकारात ट्वीन स्विंग टेलगेटचा पर्याय असेल. ही गाडी इतरत्र 9 सीटस्सह उपलब्ध असेल पण भारतात 11 सीटस्सह उपलब्ध केली जाणार आहे. 14.6 इंचाचा इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, स्क्वेअर आकाराचे स्टीयरिंग व्हील दिले जाणार आहे. सुरक्षेसाठी म्हणून गाडीत 7 एअरबॅग्ज दिल्या जाणार आहेत.