कियाची नवी सिरॉस कार पदार्पणास सज्ज
पुढील वर्षी भारत मोबिलीटी प्रदर्शनात होणार प्रदर्शित : ब्रिझा, नेक्सॉनला देणार टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी किया इंडिया यांनी आपल्या नव्या एसयूव्ही प्रकारातील गाडीची घोषणा केली असून तिचे नाव ‘सिरॉस’ असणार आहे. सदरची सिरॉस ही नवी गाडी भारत मोबिलिटी एक्सपो 2025 मध्ये प्रदर्शित केली जाणार असल्याचे समजते. एसयुव्ही गटातील सोनेटच्या धरतीवर सिरॉस तयार करण्यात आली आहे. कोरियातील कारनिर्माती कंपनी किया यांनी निर्मिलेल्या किया इव्ही 9 आणि किया टेलुराइड या मॉडेलवर आधारित सिरॉस ही नवी कार तयार केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या भारत मोबिलीटी एक्सपोमध्ये सदरची नवी सिरॉस ही गाडी सादर केली जाणार असून त्याचवेळी गाडीच्या किमतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदरची कार मारुती सुझुकीच्या ब्रिझ्झा, टाटा नेक्सॉन आणि महिंद्राच्या एक्सयुएक्स थ्री एक्स ओ या कार्सना टक्कर देणार आहे.
काय असणार वैशिष्ट्यो
या नव्या कारला फ्लॅट आणि व्हर्टीकल टेल लाईट देण्यात आलेले असून 17 इंचाचे ड्युअल टोन अलॉय व्हील्सदेखील दिली गेली आहेत. या गाडीमध्ये 465 लिटरची बूट स्पेस देण्यात आली असून सोनेटपेक्षा 80 लिटरची जागा जास्त देण्यात आली आहे. सोनेटपेक्षाही या गाडीमध्ये जागा अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
किती रंगात येणार कार
सदरची नवी एसयूव्ही गटातील गाडी 8 रंगांच्या पर्यायासह येणार असून फ्रॉस्ट ब्ल्यू, पीव्टर ओलीव्ह, अरोरा ब्लॅक पर्ल, इंटेन्स रेड, ग्रॅव्हीटी ग्रे, इम्पीरीयल ब्ल्यू, स्पार्कलिंग सिल्वर व ग्लेशीयर व्हाइट पर्ल या रंगात गाडी उपलब्ध होणार आहे.
6 एअरबॅग्ज इतर सुविधा
12.3 इंचाचा टच क्रीन इन्फोटेन्मेंट डिस्प्ले देण्यात आला असून वायरलेस चार्जर, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सोबत प्रीमियम बोस ऑडिओ सिस्टीम देखील दिली आहे. यामध्ये वायरलेस चार्जरची सुविधा असून पॅनोरमिक सनरुफचा समावेश करण्यात आलाय. 6 एअर बॅग्स, 1.0 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिनसह गाडी येणार आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सचा पर्याय गाडीमध्ये देण्यात आला आहे.