किया, ह्युंडाई कंपन्या वाढविणार कारच्या किंमती
मुंबई : टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांच्यानंतर आता आणखी दोन कंपन्या आपल्या कारच्या किंमती एप्रिलपासून वाढविणार आहेत. यामध्ये किया इंडिया आणि ह्युंडाई मोटार इंडिया यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2025 पासून किया इंडिया ही कंपनी आपल्या कारच्या किंमती 4 टक्क्यांपर्यंत वाढविणार आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती 2 टक्के वाढविण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमती वाढविल्याची घोषणा केली होती. किया इंडियाने दरवाढीबाबत घोषणा करताना सदरची वाढ ही 3 टक्क्यांपर्यंत असणार असल्याचे म्हटले आहे. कच्चा माल महाग झाल्याने त्याचप्रमाणे पुरवठ्यामध्ये आलेल्या अडचणींच्या कारणास्तव कंपनीने किंमती वाढविल्या आहेत. दुसरीकडे ऑटो क्षेत्रातील आणखी एक कंपनी ह्युंडाई मोटार इंडिया यांनीही कारच्या किमती वाढविण्याची घोषणा केली आहे. अंतर्गत खर्चात झालेली वाढ या कारणाने कंपनी 1 एप्रिलपासून आपल्या कारच्या किंमती 3 टक्के वाढविणार आहे.