‘किया’ला 10 टक्के कार विक्री वाढीची आशा
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरियातील कार निर्माती कंपनी किया इंडिया यांनी भारतामध्ये पुढील वर्षी कमीत कमी 10 टक्के इतकी कार विक्रीमध्ये वाढीची आशा व्यक्त केली आहे. परंतु पुढील वर्षी किफायतशीर किमतीतील प्रकारात कार आणण्याची योजना मात्र कंपनीची नसल्याचे सांगितले जात आहे.
दहा लाखापेक्षा कमी किमतीच्या कारच्या प्रकारांमध्ये एकही कंपनीची गाडी नव्या वर्षात येण्याची शक्यता नाही. प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि इलेक्ट्रीक वाहनांवर सध्या कंपनी आपले लक्ष केंद्रित करत आहे. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये कंपनीला 2.25 लाख वाहनांची विक्री होण्याची आशा वाटते आहे. यामध्ये 70000 वाहनांच्या निर्यातीचाही समावेश असणार आहे.
हॅचबॅकमधील वाटा घटला
पुढील वर्षी विक्रीमध्ये कमीत कमी 10 टक्के इतकी वाढ केली जाणार असल्याचा अंदाजही कंपनीने मांडला आहे. दहा वर्षामागे कंपनीचे हॅचबॅक आणि सेडान प्रकारांमध्ये 65 टक्के वाटा होता जो आता घटून केवळ 30 टक्के राहिला आहे. भारतामध्ये एसयूव्ही कार्सचा दबदबा वाढलेला आहे. त्यामुळे या गटामध्ये कंपनी आपली नवी कार पुढील वर्षी आणण्याची शक्यता आहे.
कॉम्पॅक्ट एसयुव्ही सोनेटचे सादरीकरण
अलीकडेच कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सोनेटचे सादरीकरण केले आहे. डिझेल इंजिनसह मॅन्युअल ट्रान्समिशनची सोय या गाडीमध्ये असणार असून 6 एअरबॅग्ज दिल्या गेल्या आहेत. सदरच्या एसयूव्ही कारचे प्री बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होणार असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला या गाडीच्या वितरण सुऊ होणार आहे.