‘मॉम 2’मध्ये दिसणार खुशी कपूर
थ्रिलर चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
अभिनेत्री खुशी कपूर स्वत:ची आई श्रीदेवीचा अखेरचा चित्रपट ‘मॉम’च्या सीक्वेलमध्ये काम करणार आहे. खुशीने 2023 मध्ये ‘द आर्चीज’मधून पदार्पण केले होते आणि आता ती ‘मॉम 2’चे चित्रिकरण करत आहे.
दिग्दर्शक रवि उदयवार यांचा चित्रपट ‘मॉम’ हा एक रिव्हेंज थ्रिलर होता, ज्यात श्रीदेवींनी देवकी ही भूमिका साकारली होती. ही महिला स्वत:च्या सावत्र मुलीवर झालेल्या क्रौर्याचा सूड घेणारी होती. श्रीदेवीने 2017 चित्रपटासाठी मरणोत्तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केला होता. हा चित्रपट श्रीदेवीच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता.
‘मॉम 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश कोहली करत असून यात जीशु सेनगुप्ता आणि करिश्मा तन्नाही मुख्य भूमिकेत आहे. तर याची निर्मिती खुशीचे पिता बोनी कपूर करत आहेत. मॉम 2 चित्रपटाचे चित्रिकरण उत्तरप्रदेशात यमुना एक्स्प्रेसवेच्या काठावर नव्या इंटरनॅशनल फिल्म सिटीत पार पडणार आहे.
खुशीने यापूर्वी ‘लवयापा’ आणि नादानियां या चित्रपटांमध्येही काम केले होते. परंतु तिचे हे चित्रपट फारसे यशस्वी ठरले नव्हते. मॉम चित्रपटात श्रीदेवीसोबत अक्षय खन्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी काम केले होते. तर चित्रपटात सजल अलीने श्रीदेवीच्या मुलीची भूमिका साकारली होती.