खुशी कपूरला मिळाला नवीन चित्रपट
श्रीदेवीच्या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे चित्रपट प्रेक्षक आजही आवर्जुन पाहत असतात. एकेकाळी श्रीदेवीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले होते. ती 90 च्या दशकातील सुपरस्टार होती. श्रीदेवीप्रमाणेच तिच्या मुली जान्हवी आणि खुशी कपूर बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. खुशी कपूरने अलिकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अलिकडेच ती नादानियां या चित्रपटात सैफ अली खानचा पुत्र इब्राहिमसोबत दिसून आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. अशास्थितीत खुशीचे पिता बोनी कपूर यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. खुशीसोबत मी एक चित्रपट तयार करणार आहे. हा मॉम 2 चित्रपट असू शकतो. खुशी ही स्वत:च्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे असे बोनी कपूर यांनी म्हटले आहे. श्रीदेवीचा अखेरचा चित्रपट मॉम हाच होता. या चित्रपटात तिच्या मुलीची भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने साकारली होती. बोनी कपूर आता याचा सीक्वेल तयार करणार असून यात खुशी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. बोनी कपूर याचबरोबर नो एंट्री 2 हा चित्रपट निर्माण करणार आहेत, हा चित्रपट चालू वर्षीच प्रदर्शित होणार आहे.