For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्यांदा सुवर्ण भरारी!

06:21 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
खोखोत महाराष्ट्राची  सलग सातव्यांदा सुवर्ण भरारी
Advertisement

7 वी खेलो इंडिया युवा स्पर्धा, बिहार 2025 : पदकाचा डबल धमाका, मुलांना सुवर्ण, मुलींना रौप्य 

Advertisement

वृत्तसंस्था/ गया (बिहार), नवी दिल्ली 

महाराष्ट्राने आपली हुकूमत गाजवित 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत दोन्ही गटात सलग सातव्यांदा पदकाला गवसणी घातली. मुलांनी सुवर्ण, तर मुलींच्या संघाने रूपेरी यश संपादन केले. जलतरणात पदकाचा धडका कायम ठेवत रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णासह 1 रौप्य व 1 कांस्य पदकाची कमाई केली.

Advertisement

बिपार्ड मैदानावर संपलेल्या खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. मुलांच्या गटात महाराष्ट्राने ओरीसावर 34-25 गुणांनी मात करून सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. मुलींच्या गटात ओरीसाकडून महाराष्ट्र 31-34 गुणांनी पराभूत झाला, केवळ 3 गुणांनी महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले. या संघातील विश्वविजेत्या अश्विनी शिंदे हीने सलग चौथ्यांदा पदक जिंकण्याचा विक्रमही नोदंविला.

खोखोत मुलांचे संघाचे वर्चस्व कायम

मुलांच्या गटात सुरूवातीपासून ओरीसा विरूध्द महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. अचूक गडी टिपून संरक्षणातही महाराष्ट्र आघाडीवर राहिला. जितेंद्र वासवे याने तब्बल 2 मिनिटाची ड्रीम रन करीत ओरीसाला झुंजवले. पूर्वार्धात 16-10 गुणांनी आघाडी घेतल्यानंतर आशिष गौतम, राज जाधव व शरद घाडगे यांनी अष्टपैलू खेळ करीत पहिल्याच फेरीपासून विजयी वाटचाल सुरु केली होती. 9 गुणांनी विजय संपादून महाराष्ट्राने खेलो इंडियातील आपली सुवर्ण परंपरा कायम राखली.

मुलींच्या गटात मात्र रौप्यपदक

मुलींच्या गटात महाराष्ट्राची आक्रमणात पिछेहाट झाल्याने ओरिसाने बाजी मारली. अटीतटीच्या लढतीत पहिल्या मिनिटापासून महाराष्ट्राने चपळ दर्शवली. अमृता पाटील, सुहानी धोत्रे व प्रतिक्षा बिराजदार यांचा अष्ट्रपैलू खेळ सामना जिंकण्यासाठी अपुरा ठरला. गडी बाद करण्यात अपयश आल्याने ओरीसाने 3 गुणांनी विजेतेपद पटकावले. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलीचे हे सातवे पदक आहे. गत तामिळनाडू स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पीयन ठरला होता.

जलतरणात महाराष्ट्राची घोडदौड सुरुच

बिपार्ड जलतरण तलावावर सुरू असलेल्या जलतरणात  मुलींच्या 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदकाचा सूर मारला. निशी रुहील, समाईरा मल्होत्रा, आदिती हेगडे, अल्फेया धनसुरा या संघाने 4 मिनिटे 31.09 सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण कामगिरी केली. कर्नाटकला रौप्य तर तमिळनाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदिती हेगडेने स्पर्धेत पदक जिंकण्याचा षटकार झळकविला आहे. 4 सुवर्ण 2 रौप्य पदकाची सर्वाधिक पदकाची करिश्मा घडविला आहे.

18 वर्षांखालील मुलींच्या 200 मीटर मिडले प्रकारात निशी रुहील (2:29.62 सेकंद) हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकच्या मानवी वर्माने (2:28.03 सेकंद) सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या 800 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटील (8.42.15 सेकंद) याला कांस्यपदाकवर समाधान मानावे लागले. निशी व अथर्वराजचे हे स्पर्धेतील दुसरे पदक आहे.

नेमबाजीत पार्थ-शांभवी जोडीचा अचूक निशाणा

महाराष्ट्राच्या पार्थ माने व शांभवी क्षीरसागर या जोडीने पात्रता फेरीपासून वर्चस्व गाजवित 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर शुक्रवारीही महाराष्ट्राचा सुवर्ण धमाका कायम राहिला. वैयक्तिक प्रकारात सोनेरी यश मिळविलेल्या शांभवी क्षीरसागर हिने पार्थ मानेच्या साथीत 10 मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवित 634.9 गुणांसह अव्वल स्थानासह अंतिम फेरीत धडक दिली. मानांकनात कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहार या संघांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानावर राहिला. सुवर्णपदकासाठी महाराष्ट्र व कर्नाटक लढत रंगली. पहिल्या फेरीपासूप अनुभवी पार्थच्या साथीने शांभवीने संयमी खेळी करीत अव्वल स्थान कायम राखले. शांभवी-पार्थ या महाराष्ट्रीय जोडीने 16 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा वेध घेतला. कर्नाटकच्या प्रणव नरेन-हद्या कांदुर जोडीला 12 गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बिहारच्या रूद्र प्रताप सिंह व दिव्या भह जोडीने उत्तर प्रदेशला 16-14 गुणांनी पराभूत करीत कांस्यपदकाच्या लढतीत बाजी मारली.

Advertisement
Tags :

.