For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिजात शिल्पकलेचा अद्भूत नमुना, Khidrapur Kopeshwar मंदिर का आहे खास?

01:43 PM Aug 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
अभिजात शिल्पकलेचा अद्भूत नमुना  khidrapur kopeshwar मंदिर का आहे खास
Advertisement

चालुक्य राजाच्या कालावधीमध्ये या मंदिराची काम पूर्ण झाल्याचा संदर्भ मिळतो

Advertisement

By : रवींद्र केसरकर

कुरुंदवाड : कृष्णा पंचगंगा संगम काठावर वसलेला शिरोळ तालुका हा शेतीप्रधान आणि सधन तालुका म्हणून ओळखला जातो. याचबरोबर येथील कृष्णा काठावरील प्राचीन कोपेश्वर महादेवाचे मंदिर ही प्रसिद्ध आहे. अद्भुत शिल्प कलेमुळे याला महाराष्ट्राचे खजुराहो म्हणूनही ओळखले जाते. चालुक्य राजाच्या कालावधीमध्ये या मंदिराची काम पूर्ण झाल्याचा संदर्भ मिळतो.

Advertisement

शिलाहार घराण्यातील अति प्राचीन शिल्प स्थापत्य शैलीतील संपूर्ण दगडी मंदिर आहे. कोपेश्वर मंदिराचे नाव हे सती, शिव आणि दक्ष यांच्यातील एका पौराणिक घटनेचा संदर्भ देते. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे..

गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याडला कधीच छत नव्हते.

कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.

स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत.

या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतर्भागात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन कोपेश्वर आणि धोपेश्वर अशी शिवलिंगे आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत.जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत.

दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत.पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंघण यांचा एक शिलालेख आहे.

बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात. 108 दगडी खांबावरती संपूर्ण मंदिर पेलेले आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी1954 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे

कोपेश्वर मंदिरात नंदी नाही...

सर्वसाधारणत:महादेव मंदिरात नंदी असतो मात्र येथील प्राचीन कोपेश्वर मंदिरात कोपेश्वर आणि धोपेश्वर असे जोडलिंग असून या प्राचीन महादेव मंदिरात इतर महादेव मंदिराप्रमाणे नंदी नाही हे या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्या आहे.

चित्रपट शूटिंग

या प्राचीन मंदिरात हळदीकुंकू सारख्या जुन्या मराठी चित्रपटाची शूटिंग झाले होते याचबरोबर सुबोध भावे यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’या चित्रपटातील‘भोला भंडारी ‘ या गाण्याचे चित्रकारण येथे झाले होते.

Advertisement
Tags :

.