Khidrapur Temple : शिलाहार कलेचा अजोड नमुना खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर...
कोपेश्वराचं मंदिर म्हणजे जणू दगडात कोरलेलं काव्यच आहे
कोल्हापूर : भारतीय स्थापत्यकला ही भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. भारतीय संस्कृतीतील महाकाव्ये, पुराणे इत्यादींचे प्रतिबिंब भारतीय शिल्पकलेत आणि स्थापत्यात पडलेले दिसते. त्यामुळे प्राचीन भारतीय मंदिरे ही फक्त उपासनेची ठिकाणं नव्हती तर उत्तमोत्तम शिल्पांनी सजलेली कलेचीही जणू प्रदर्शन स्थळेच होती.
कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळासोबतच अजूनही एका प्राचीन आणि अतिशय देखण्या अशा मंदिराचा वारसा लाभलेला आहे आणि ते मंदिर म्हणजे शिलाहार कलेचा अजोड नमुना असणारे खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. साधारण 12 व्या शतकात निर्माण झालेलं कोपेश्वराचं मंदिर म्हणजे जणू दगडात कोरलेलं काव्यच आहे.
अनेक हत्तींनी आपल्या पाठीवर तोलून धरलेलं हे सर्वांगसुंदर शिव मंदिर ऊन, पाऊस आणि कृष्णेच्या पुराचे तडाखे सोसत शेकडो वर्षे उभे आहे. पण एकेकाळी हे मंदिर मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेले होते आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्याच राजाराम कॉलेजच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी हे मंदिर उत्खनन करून बाहेर काढले हे तुम्हाला नक्कीच माहीत नसेल.
कृष्णेला आलेल्या पुरामुळे मंदिराच्या परिसरात गाळ माती साठत असे. असा गाळ साठता साठता मंदिराच्या परिसरात जवळपास बारा फुटांचे मातीचे ढीग जमा झाले आणि मंदिराचा बराचसा भाग त्याखाली दिसेनासा झाला. पण कुठलीही गोष्ट अशी कायमची लपून रहात नाही. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे उपप्राचार्य आणि पुरातत्वज्ञ डॉ. के. एन. सीताराम यांच्या खिद्रापूर भेटीनंतर त्यांनी या मंदिराला पुन्हा उजेडात आणण्याचा निर्धार केला.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या परवानगीने आणि राजाराम कॉलेजचे विद्यार्थी तसेच खिद्रापूरचे गावकरी यांच्या मदतीने या सीताराम यांनी काळजीपूर्वक हे मातीचे ढिगारे उपसायला सुरुवात केली. जवळपास आठ महिने हे काम सुरू होते कारण मंदिराच्या बाह्यांगावरच्या कोणत्याही शिल्पाची नासाडी होऊ न देता हे काम पार पाडणे गरजेचे होते.
अखेर 1928 साली म्हणजे 97 वर्षांपूर्वी हे मंदिर पुन्हा मूळ स्वरूपात आले. ही सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वाची घटनाही काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली होती. पण दिनांक 11 ऑगस्ट 1928 च्या ‘द इलस्ट्रेटेड लंडन न्यूज‘ या ब्रिटिश वृत्तपत्रात छापून आलेली बातमी ब्रिटिश अर्काईव्हजमध्ये मला सापडली आणि त्यातून या सगळ्या घटनेचा उलगडा झाला.