खेराडे- विटयाच्या तलावाला अतिक्रमणाचे ग्रहण
कडेगाव :
खेराडे-विट्याच्या तलावाला अतिक्रमणाचे ग्रहण लागले असून तलावाशेजारील स्थानिक शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या काळात साथ देणाऱ्या तलावामध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तलावाला धोका निर्माण झाला आहे. खेराडे विट्याच्या लोकांची तसेच परिसरातील शेतकऱ्यांची जीवन वाहिनी बनलेला हा तलाव गेल्या अनेक वर्षापासून खेराडे-विटेकरांची लहान भागवत आहे.
या तलावाच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तलावात व गायरानच्या परिसरात देखील अतिक्रमण केल्याची बाब निर्देशनास येत आहे. तलावा शेजारील मोकळ्या जागेत जनावरे चारण्यासाठी बांधलेली जात आहेत. तसेच विविध प्रकारे येथे अतिक्रमण केल्याचे दिसते. त्यामुळे तलावाच्या शेजारी केलेल्या अतिक्रमणामुळे तलावाला धोका निर्माण होऊ लागला आहे. हा तलाव फुटण्याची शक्यता सुध्दा व्यक्त होत आहे.
या प्रश्नी संबंधित विभागानी लक्ष घालून या बाबतीत सदरच्या तलावात होणारे अतिक्रमण रोखावे व अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.