खेलो इंडिया युवा स्पर्धा 4 मे पासून
वृत्तसंस्था / पाटणा
बिहारमधील पाटणा येथे 4 मे पासून 2025 ची खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी बोलविलेल्या पत्रकार परिषदेत केली.
बिहारमध्ये गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे भरविल्या जात आहेत. राज्यातील क्रीडा क्षेत्राची रुपरेषा अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे प्रयत्न सातत्याने चालु आहेत.4 मे पासून सुरु होणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत विविध राज्यातील सुमारे 8500 खेळाडू तसेच 1500 प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी येथे स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सदर स्पर्धा बिहारमधील पाच विविध जिल्ह्यांमध्ये घेतली जाणार आहे.