खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा दिल्लीत
नवी दिल्ली : देशात पहिलीच खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा दिल्लीमध्ये 10 ते 17 डिसेंबर दरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेत 32 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील सुमारे 1350 खेळाडू सात विविध क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखवतील. देशातील पॅरा क्रीडा विभागामध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी केंद्रीय क्रीडा खात्याकडून प्रयत्न सुरू होता आणि त्याला यशही मिळाले, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिली. दिल्लीतील विविध स्टेडियम्स आणि मैदानांमध्ये ही क्रीडा स्पर्धा घेतली जाणार असून एकूण सात क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश राहिल. दिल्लीतील भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) तीन स्टेडियम्सवर काही क्रीडा प्रकार घेतले जातील. अॅथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि वेटलिफ्टिंग हे क्रीडा प्रकार घेतले जातील. आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारे भारताचे शितलदेवी, भाविना पटेल, एकता भ्यान, सिंगराज, मनिष, सोनल, राकेशकुमार आणि सरिता हे स्पर्धक आपल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करतील.