Crime News Ratnagiri : अमली पदार्थविरोधात धडक कारवाई, 2 किलो गांजा, ब्राऊन हेरॉईन जप्त
पोलिसांना खेड रेल्वे स्टेशन येथे एक इसम संशयास्पद असल्याचे आढळले
रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांकडून मागील काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. खेड पोलिसांनी तुतारी एक्सप्रेस व भरणे नाका येथे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एकूण 2 किलो गांजासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
शहरालगतच्या एमआयडीसी येथे ब्राऊन हेरॉईन अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या इसमाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणला यश आले. त्याच्याकडून 67 हजार रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
4 जून रोजी मुंबई येथून एक इसम दुचाकीवरून खेड शहरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खेड पोलिसांनी खेड भरणे नाका येथे दुचाकीस्वाराला 1 किलो गांजासह ताब्यात घेतले. कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजित विचारे (20, रा. नालासोपारा-मुंबई) असे संशयिताचे नाव आहे.
त्याचप्रमाणे तुतारी एक्स्प्रेसमधून एक इसम हिरव्या रंगाच्या बॅगमधून गांजा विक्रीसाठी रत्नागिरीत येत असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खेड पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. पोलिसांना खेड रेल्वे स्टेशन येथे एक इसम संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्याची झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्याकडून 1 किलो गांजा आढळून आला.
रवींद्र प्रेमचंद खेलारिया (25, रा. मिरा रोड, ठाणे) याला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई खेड पोलीस निरिक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल रुपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ, हवालदार विक्रम पाटील यांनी केली. तर रत्नागिरी शहरालगतच्या एमआयडीसी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून गस्त घालण्यात येत होती.
यावेळी एमआयडीसी येथील एका हॉटेलच्या पुढील बाजूला एक संशयास्पद इसम पोलिसांना आढळून आला. त्याची पोलिसांनी तपासणी केली असता त्याच्याकडे ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ आढळून आला. शफाकत हसन आदम राजापूरकर (40, रा. देवऊख) याच्या ताब्यातून 10 ग्रॅम वजनाचा व 67 हजार रुपयांचा ब्राऊन हेरॉईन हा अमली पदार्थ स्थानिक गुन्हे अन्वेषणने जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, कॉन्स्टेबल अतुल कांबळे आदींनी केली.
पोलीस पाटील लिमयेंच्या आत्महत्येचा सखोल तपास करणार
शहरालगतच्या कर्ला येथील पोलीस पाटील उदय लिमये यांच्या आत्महत्येबाबत आपण माहिती घेत असून याप्रकरणी सखोल तपास करणार असल्याचे पोलीस अधीक्षक बगाटे यांनी सांगितले.