Ratnagiri News : पत्नीची तक्रार; रागातून स्वतःचेच घर पेटवले
12:46 PM May 14, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
अन्य महिलेशी पतीचे प्रेमसंबंध असल्याची केली होती तक्रार
खेड : पतीचे अन्य महिलेशी प्रेमसंबंध असल्याने येथील पोलीस ठाण्यातील महिला कक्षात तक्रार दिल्याच्या रागातून सचिन सत्यवान जुबळे (रा. कोतवली, टेप-भोईवाडी) याने स्वतःचेच घर पेटवल्याची घटना १२ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. या आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
घराला आग लावून नुकसान केल्याप्रकरणी सचिन जुबळे याच्यावर मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत संशयित आरोपी सचिन जुबळे याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याअगोदर तिने आपल्या पतीचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याबाबत पोलीस ठाण्यातील मदत कक्षात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार महिला समुपदेशन केंद्राच्या विशाखा चव्हाण यांनी संशयित सचिन जुबळे व त्याच्या प्रेयसीला चौकशीसाठी बोलावले होते.
याच रागातून जुबळे याने आपले व फिर्यादीचे राहते घर नष्ट करण्याच्या हेतूने घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कोणत्या तरी ज्वलनशील पदार्थाने घराला आग लावली. या आगीत घराच्या छतावरील सर्व लाकडी भाले जळाल्याने सर्व कौले खाली कोसळली. आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली. नुकसानीचा आकडा अद्याप काढण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.
Advertisement
Advertisement