For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : किंजळे ग्रामस्थांची तहान 'जार'च्या पाण्यावर

12:05 PM Jun 04, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ratnagiri news   किंजळे ग्रामस्थांची तहान  जार च्या पाण्यावर
Advertisement

Advertisement

खेड : तालुक्यातील किंजळे तर्फे नातू-कळकरायवाडी येथे पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पाण्याचे उपलब्ध जलस्रोत आटल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी अक्षरशः हंबरडा फोडत आहेत. विहिरीतील पाणीही पूर्णतः आटले आहे. येथील प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यामुळे गावातीलच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून ग्रामस्थांना दररोज २० लिटर क्षमतेचे ५ पाण्याचे जार उपलब्ध करून दिले जात आहे. रणरणत्या उन्हामुळे ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झालेले असतानाच उपलब्ध पाण्याचे जलस्रोत कोरडे पडल्याने किंजळे तर्फे नातू-कळकरायवाडी येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी दाहीदिशाच सुरू झाली आहे.

Advertisement

येथील पंचायत समितीकडे टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर २९ मे पासून टँकरने पाणीपुरवठाही करण्यात येत आहे. एकदिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे अन्य वापरासाठी वापरण्यात येत आहे. जवळपास पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने जल फाऊंडेशन कोकण विभाग संस्थेचे अध्यक्ष नितीन जाधव व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

तालुक्यातील सुकिवली येथील एका व्यक्तीकडून पाण्याचे जार विकत घेत ते ग्रामस्थांना वितरीत केले जात आहे.  कळकरायवाडी येथे ५० च्या आसपास लोकसंख्या आहे. या ग्रामस्थांना प्रत्येकी २० लिटर क्षमतेचे ५ पिण्याचे जार देण्यात येत आहेत. या जारच्या पाण्यावरच ग्रामस्थ तहान शमवत आहेत.

Advertisement
Tags :

.