For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाचा घाला, जगबुडी नदीत कार कोसळली

10:55 AM May 20, 2025 IST | Snehal Patil
अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांवर काळाचा घाला  जगबुडी नदीत कार कोसळली
Advertisement

चालकाची प्रकृती चिंताजनक, अन्य एक बचावला, मृतांमध्ये 2 विवाहित महिला

Advertisement

खेड : मीरारोड येथून कर्ली-देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघालेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांवर काळाने घाला घातला. सोमवारी पहाटे 5.15 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीत किया कार कोसळून 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 19 वर्षीय युवकासह दोन विवाहितांचा समावेश आहे.

चालक परमेश पराडकर (52) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. मिताली विवेक मोरे (45), निहार विवेक मोरे (19), मेघा परमेश पराडकर (50), सौरभ परमेश पराडकर (22), श्रेयस राजेंद्र सावंत (25 सर्व रा. मीरारोड-ठाणे) अशी मृतांची नावे आहेत. या भीषण अपघातात विवेक श्रीराम मोरे हे बालंबाल बचावले असून त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

Advertisement

आवाजाने सारेच हादरले

मोरे व पराडकर कुटुंबिय किया कारने (एमएच 02 एफएक्स 3265) कर्ली-देवरुख येथील सासरे मोहन काशिराम चाळके यांच्या अंत्यविधीसाठी येत होते. परमेश पराडकर कार चालवत होते. कार भरणे जगबुडी पुलानजीक आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळली.

यावेळी झालेल्या आवाजाने सारेच हादरले. पोलीस ठाण्यातला दूरध्वनी खणखणला अन् पोलीस अधिकारी, कर्मचारी, अन्य प्रशासकीय यंत्रणा आणि मदतकर्त्यांची धावाधाव सुरू झाली. रुग्णवाहिकाही तातडीने घटनास्थळी पोहचल्या. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अपघाताची माहिती देण्यात आली.

पाच जणांचा जागीच अंत

अपघात इतका भीषण होता की, पुलावरील संरक्षक कठड्यावरून नदीत कोसळलेल्या किया कारचा चेंदामेंदा होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बचावलेल्या एकासह गंभीर जखमी झालेल्या चालकास बाहेर काढण्यात आले. पाचही जणांचे मृतदेह कारमध्येच अडकले होते. क्रेनच्या सहाय्याने सर्वप्रथम मृतदेह अडकलेली कार वर आणण्यात आली. सरतेशेवटी चेंदामेंदा झालेल्या कारची तोडफोड करत पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. कारमधून अक्षरश: रक्ताचे पाट वाहत होते.

शेकडो हात गुंतले मदतकार्यात

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून मदतकार्य हाती घेतले. मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मदतग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी, बुरहान टाके, प्रतीक जाधव, दीपक जोंधळे स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व अन्य नागरिकांचे शेकडो हात मदतकार्यात गुंतले.

अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक काहीकाळ थबकली होती. वाहतूक नियंत्रणासह बघ्यांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांसह आरसीबी पोलिसांची फौज जगबुडी पुलावर तैनात करण्यात आली होती. जिल्हा अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी भागूजी औटी अपघातस्थळी दाखल झाले होते. सुरुवातीला अंधारामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले.

नव्या जगबुडी पुलावर पहिलाच प्राणांतिक अपघात

नव्या जगबुडी पुलाच्या उभारणीनंतर सोमवारी झालेला हा अपघात हा पहिला प्राणांतिक अपघात ठरला आहे. कारमधून पाचही मृतदेह अथक प्रयत्नाने बाहेर काढल्यानंतर विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तैनात रुग्णवाहिकांच्या सहाय्याने नेण्यात आले. जखमी चालकास सर्वप्रथम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाकाली’ अपघाताच्या आठवणी झाल्या ताज्या

मुंबई-गोवा महामार्गावरील जुन्या ब्रिटिशकालीन जगबुडी पुलावरुन 19 मार्च 2013 मध्ये महाकाली खासगी आरामबस जगबुडी नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 39 जणांचा हकनाक बळी गेला होता. तेव्हा कोरड्या नदीपात्रात अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले होते. आजच्या अपघाताने महाकाली बस अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

Advertisement
Tags :

.