Ratnagiri News : दापोली-खेड मार्ग पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार? PWD कडून दावा
पावसाळ्यापूर्वी पूल आणि काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण होतील
By : मनोज पवार
दापोली : सागरी महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा असलेल्या खेड-दापोली या 29 कि.मी. रस्त्याचे काम सध्या ’हायब्रीड अॅन्युटी’ अंतर्गत सुरू आहे. मात्र सुरू असलेल्या कामांमुळे या रस्त्यावरील प्रवास कमालीचा त्रासदायक बनला आहे. पावसाळ्यापूर्वी पूल आणि काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण होतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. मात्र, चारही पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास वाहतूक बंद होण्याची भीती प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
जिह्याच्या उत्तर भागातील जनतेच्या दृष्टीने खेड-दापोली रस्ता वाहतुकीसाठी प्रमुख महत्त्वाचा मार्ग आहे. दापोलीहून रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हायब्रीड अॅन्युटी योजनेंतर्गत (सरकार एका ठराविक कालावधीसाठी निश्चित रकमेमध्ये आणि नंतर उर्वरित कालावधीत बदलत्या रकमेत पैसे देते) या रस्त्याच्या कामाला ऑगस्ट 2022 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली.
त्यासाठी 105.26 कोटी रकमेला तांत्रिक मान्यता देण्यात आली. एकूण 29.20 कि.मी. लांबी आणि 7 मीटर रुंदीच्या या मार्गात कोणत्याही प्रकारचा मोठा पूल नव्याने बांधण्यात येणार नाही. मात्र अस्तित्वात असणाऱ्या 14 पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यापैकी 4 पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता आशा जटाल यांनी दिली आहे.
बहुतांशी रस्ता डांबरी
29 कि. मी.च्या रस्त्यापैकी 20 हजार 89 मीटरचा रस्ता डांबरी तर 8 हजार 932 मीटरचा रस्ता काँक्रिटचा करण्यात येणार आहे. एकूण 10 स्लॅप ड्रेन व बॉक्स कन्व्हर्ट बांधण्यात असून तब्बल 76 मोऱ्या आहेत. यामध्ये 72 मोऱ्या याआधीच अस्तित्वात होत्या, तर नवीन 4 मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत. रस्त्याला एकूण 11 मोठे व लहान 14 चौक तसेच 10 बस थांबे देखील बांधण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूला मिळून 15 हजार 664 मीटरची गटारे देखील बांधण्यात येणार आहेत.
डांबरीकरण काम पावसाळ्यानंतर
रस्त्याच्या प्रत्येक कि.मी.ला 419.17 लक्ष रुपये खर्च येणार आहे. काम पूर्ण करण्याची मुदत 2 वर्ष असून ही मुदत सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे. तोपर्यंत रस्त्याची सर्व प्रकारची कामे ठेकेदाराने पूर्ण करायची आहेत. या रस्त्याचे काम एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले आहे. या रस्त्याचे काम दर्जाप्रमाणे सुरू असून पावसाळ्यापूर्वी सर्व काँक्रिटची कामे व पुलाची कामे पूर्ण होतील. उर्वरित डांबरीकरणाची कामे ही पावसाळ्यानंतर पूर्ण होतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.
अवजड वाहतुकीसाठी दापोली-खेड रस्ता बंद
या मार्गावर वाकवली येथे नव्याने काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने तेथे सद्यस्थितीत एकेरी वाहतूक चालू आहे. यातच अवजड वाहने आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे दापोलीकडे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा सुरू असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी 10 जूनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक खेड-दस्तुरीमार्गे वळवण्याचे आदेश दिलेले आहेत.
सूचना फलक लावण्याचे आदेश
वाहतुकीची कोंडी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करावे, वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने दापोली पोलिसांनी दापोली व स्थानकासमोरील चौकात गृहरक्षक दलाच्या महिलांना अवजड वाहतूक वळवण्याकरिता नियुक्त केले आहे.
सद्यस्थितीत अनेक अडचणी
सद्यस्थितीत या मार्गावर चार पुलांची कामे अद्याप अर्धवट असून अनेक मोऱ्यांची कामे सुरू आहेत. जेथे मोऱ्यांची कामे झालेली आहेत तेथे डांबराचा पॅच मारण्यात आलेला आहे. हा डांबराचा पॅच आणि मूळ रस्ता यामध्ये तफावत असल्याने या ठिकाणी गाड्या आदळत आहेत. वाकवली येथे कोणाचीही मागणी नसताना काँक्रिटचा रस्ता बनवताना सध्या एका मार्गिकेचे काम सुरू आहे.
येथे वाहतूक एका मार्गिकेतून सुरू असल्याने वाहनांची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे ही वाहतूक आता पालगड मार्गे वळवण्यात आलेली आहे. मात्र वाकवली येथील रस्ता हा मूळ रस्त्यापासून सुमारे एक फूट उंच करण्यात आल्याने साईडपट्टी कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या काँक्रिटच्या रस्त्यामुळे भविष्यात येते अपघाताचा धोका देखील व्यक्त करण्यात येत आहे.