ऑस्ट्रेलियन संघात ख्वाजाचे पुनरागमन
सिडनी : यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना येथे रविवार 4 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी उस्मान ख्वाजाचे संघात पुनरागमन झाले आहे. या शेवटच्या कसोटीत कमिन्सच्या गैरहजेरीत स्टिव्ह स्मिथकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-1 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. बलाढ्या ऑस्ट्रेलियाने सलग पहिले तीन सामने जिंकून मालिका काबीज केल्यानंतर चौथ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दोन्ही संघांचे डाव कोलमडले.
केवळ दोन दिवसांमध्ये हा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. या विजयामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. त्यामुळे सिडनीच्या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलिया दौरा संपण्यापूर्वी स्टोक्सचा इंग्लंड संघ आणखी एक विजय नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत नियमीत कर्णधार पॅट कमिन्स पाठदुखापतीच्या समस्येमुळे खेळू शकला नाही. त्याच्या गैरहजेरीत स्टिव्ह स्मिथने संघाचे नेतृत्व करताना इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर अॅडलेडच्या तिसऱ्या कसोटीत कमिन्सने आपला सहभाग दर्शविला होता आणि अॅशेस मालिकेच्या जेतेपदावर त्याने शिक्कामोर्तब केला.
ऑस्ट्रेलियन संघ : स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), बोलॅन्ड, कॅरे, डॉगेट, ग्रीन, हेड, इंग्लीस, उस्मान ख्वाजा, लाबुसेन, मर्फी, नेसर, जाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, विथराल्ड आणि वेबस्टर.