वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ख्वाजा-कमिन्सला विक्रमाची संधी
मंगळवारपासून ऑस्ट्रेलिया-द.आफ्रिकेत रंगणार मेगा फायनल : वर्चस्वासाठी दोन्ही संघात चुरस
वृत्तसंस्था/ लंडन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जेतेपदासाठी मंगळवारपासून बलाढ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. हा सामना 11 ते 15 जून दरम्यान लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत पोहचण्याची ही एकूण आणि सलग दुसरी तर दक्षिण आफ्रिकेची पहिली वेळ आहे. गतविजेत्या ऑस्ट्रेलियासमोर ही ट्रॉफी कायम राखण्याचे आव्हान तर दक्षिण आफ्रिका पहिल्या प्रयत्नात ही ट्रॉफी जिंकणार का? याकडेही चाहत्यांचं लक्ष आहे. दरम्यान, या महाअंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा या दोघांना खास कामगिरी करण्याची संधी आहे.
पॅट कमिन्सने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एकूण 67 कसोटी सामने खेळले आहेत. आपल्या कारकीर्दीमध्ये त्याने 294 विकेट्स नावावर केल्या आहेत. जर कमिन्स आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात 5 विकेट्स घेण्यास यशस्वी झाला, तर तो कसोटीत 300 विकेट्स पूर्ण करेल. अशी कामगिरी करणारा कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा सहावा वेगवान गोलंदाज ठरु शकतो. लॉर्ड्सच्या मैदानावर कमिन्स आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी मोठा धोका ठरु शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. बुमराहने 15 सामन्यांमध्ये एकूण 77 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर कमिन्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कांगारू कर्णधाराने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 73 विकेट्स घेतल्या आहेत. कमिन्सने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये 5 विकेट्स घेण्यात यश मिळवले तर या सायकलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनेल. मिचेल स्टार्क 72 विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ख्वाजाला 6 हजार धावा पूर्ण करण्याची संधी
ख्वाजाला या अंतिम सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. उस्मानला यासाठी फक्त 70 धावांची गरज आहे. ख्वाजाने आतापर्यंत 80 सामन्यांमधील 144 डावांमध्ये 16 शतके आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 930 धावा केल्या आहेत.
लॉर्ड्सवर रंगणार मेगा फायनल
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना 11 जून ते 15 जून दरम्यान खेळवला जाणार आहे. तर 16 जून हा राखीव दिवस असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स व जिओ सिनेमावर करण्यात येणार आहे.