खासबाग मैदान लवकरच सरावासाठी उपलब्ध करुन देऊ
कोल्हापूर :
शाहू खासबाग कुस्ती मैदान सरावासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपासून पैलवान करत होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाहू खासबाग मैदानाची पाहणी केली. यावेळी लवकरच मैदान सरावासाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. तसेच मॅटवरील सरावासाठी नागेशकर व्यायाम शाळेत परवानगी देण्यात आली.
कोल्हापूर येथे पारंपरिक कुस्ती मेहनत व्यायामासाठी शाहू खासबाग कुस्ती मैदान उपलब्ध करून द्यावे ही मागणी केली दोन महिने पैलवानांच्यावतीने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी खासबाग मैदानाची पाहणी केली. नजीकच्या नागेशकर व्यायाम शाळेत मॅटवर कुस्ती सरावा प्रशासनाने मान्यता दिली आणि खासबाग मैदानातील लाल मातीचा आखाडा केशवराव भोसले नाट्यागृहाच्या बांधकामाला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने बॅरेकेटींग लावून लवकरच उपलब्ध करून देत आहोत असे लेखी आश्वासन दिले. यामुळे कृती समितीने बुधवारी होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
यावेळी इस्टेट ऑफिसर विलास साळुंखे नागरी समितीचे अशोक पोवार,रमेश मोरे,राजाभाऊ मालेकर,वस्ताद विश्वास हारुगले व कुस्तीगीर पैलवान उपस्थित होते.