Kolhapur News : कोल्हापुरातील खासबाग कुस्ती मैदान उजळले !
विद्युत दिव्यांच्या प्रकाशात खासबाग मैदान; मल्लांची गैरसोय दूर
कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानबुधवारी सायंकाळी विद्युत दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाले. विद्युत दिवे सुरु करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
विद्युत दिव्यांअभावी मल्लांची सराव करताना होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान वर्षभरापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दोन्ही वास्तुंच्या पुर्नबांधणीचे काम सुरु आहे.
पुर्नबांधणीच्या कामा दरम्यान आखाड्याची दुरवस्था झाली होती. मल्लांनी आखाड्याची स्वच्छता करत तो पुन्हा शड्डू ठोकण्यासाठी सज्ज केला. आखाड्याची आमदार अमल महाडिक यांनी पाहणी केली. यावेळी मल्ल, कुस्तीप्रेमींनी विद्युत दिवे नसल्याने पहाटे, सायंकाळी सराव करताना अडचण येत असल्याची तक्रार केली. त्यानुसार आमदार महाडिक यांनी महापालिका प्रशासनास विद्युत दिवे बसवण्याची सूचना केली. सूचनेनुसार महापालिकेने विद्युत दिवे बसवले आहेत.