For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासबाग मैदानाच्या नावाने प्रथमच खासबाग केसरी ! अनेक केसरी घडविणाऱ्या मैदानाचा आगळावेगळा सन्मान

01:32 PM Feb 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
खासबाग मैदानाच्या नावाने प्रथमच खासबाग केसरी   अनेक केसरी घडविणाऱ्या मैदानाचा आगळावेगळा सन्मान
Khasbag Maidan
Advertisement

कुस्तीक्षेत्रातून समाधान व कौतुक

गजानन लव्हटे / सांगरूळ

Advertisement

राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पकतेतून साकारलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात अनेक जागतिक दर्जाचे मल्ल लढले . अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल घडले .हिंदकेसरी महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी यासारख्या अनेक केसरी स्पर्धा या मैदानात झाल्या .पण खासबाग मैदानाच्या नावाने होणारी खासबाग केसरी कुस्ती मैदान प्रथमच होत आहे.खासबाग मैदानाच्या नावाने होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कुस्ती मैदानाचे कुस्ती क्षेत्रातून कौतुक होत आहे आणि आणि समाधान व्यक्त होत आहे .

राजर्षी शाहू महाराज यांनी रोममधील ऑलिम्पिकचे स्टेडियम व ओपन थिएटर पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. राजघराण्यातील माणसांसाठी खास राखून ठेवलेल्या बागेत अर्थात खासबागेत या मैदानाची संकल्पना व आराखडा ठरविला. त्याप्रमाणे इ.स. १९०७ साली खासबाग मैदान बांधण्यास सुरुवात झाली आणि २० एप्रिल १९१२ मध्ये आखाडा बांधून पूर्ण झाला. या संपूर्ण मैदानात सुमारे २५ ते ३० हजार लोक भारतीय बैठकांवर बसू शकतात. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसले तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते, हेच या मैदानाचे वैशिष्ट्य आहे.

Advertisement

या मैदानाच्या उद्‌घाटनाच्या वेळी जगज्जेता पहिलवान गामा याचा भाऊ इमामबक्ष ऊर्फ धाकटा गामा व गुलाम मोहिद्दीन यांच्यात लढत झाली होती. यात इमामबक्षने मोहिद्दीनला अस्मान दाखवले. बक्षीस दिली तसेच पराभूत मल्लालादेखील बक्षीस दिले. तेव्हापासून चांदीची गदा देणे आणि पराभूत मल्लांचा सन्मान करणे या परंपरेलाही सुरुवात झाली.

हिंदकेसरी मारुती माने व मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे यांच्यातील साडेतीन तास झालेली कुस्ती .सादिक पंजाबी, गोगा,तसेच महमद हनिफ गणपत आंधळकर दिनकर दह्यारी मारुती वडार श्रीपती खंचनाळे .चंबा मुतनाळ लक्ष्मण काकती चंदगीराम लक्ष्मण वडार युवराज पाटील सतपाल हरिश्चंद्र बिराजदार युवराज पाटील दादू चौगले , बाळू पाटील, लक्ष्मण वडार, शंकर तोडकर ,विष्णू जोशीलकर, , नामदेव मोळे, रामा माने विजय कुमार झारखंडेराय आधीअनेक मल्लानी खासबागची तांबडी माती आपल्या अंग खांद्याला लागल्याशिवाय आपल्या कुस्तीचे सार्थक झाले नाही असेच म्हणले पुढे मॅटवरील कुस्तीच्या युगातही मल्लांना खासबाग मैदानाची भुरळ पडतेच
या मैदानात रुस्तुम ए हिंद, महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी, शाहू केसरी, महापौर केसरी, गोकुळ केसरी अशा केसरी पदाच्या विविध स्पर्धा आजपर्यंत झाल्या आहेत .कोल्हापुरातील आणि संपूर्ण देशातील सर्वच नामांकित मल्ल घडविण्यात खासबाग कुस्ती मैदानाचे मोठे योगदान आहे .या मैदानाच्या सन्मान करण्यासाठी प्रथमच खासबाग केसरी कुस्ती मैदान होत आहे याचे सर्वच दिग्गज मल्ल व कुस्तीशौकीनातून कौतुक होत आहे .

महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे पैलवान संग्राम कांबळे यांच्या संकल्पनेतून हे मैदान होत आहे .वडीलार्जीत कुस्तीची परंपरा असणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील पैलवान संग्राम कांबळे गंगावेश तालमीचे माजी पैलवान आहेत .तालमीतून निवृत्त झाले तरी त्यांची तालमीशी नाळ कायम जोडलेली आहे .गंगावेस तालीम आणि खासबाग मैदान बाबत असणारा जिव्हाळा त्यांनी कायम राखला आहे .

तालमीवरील प्रेमापोटी गंगावेस तालमीचा महाराष्ट्र केसरी झाल्यास हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा त्यांनी तीन-चार वर्षांपूर्वी केली होती .सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याची त्यांनी हत्तीवरून मिरवणूक काढली .खासबाग मैदानाच्या दुरावस्थेबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून मैदानाची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला आहे .
ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या कार्याचा गौरव भारत सरकारने करावा यासाठी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांच्यापासून राज्याचे मुख्यमंत्री क्रीडामंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या पर्यंत कुस्ती मल्लविदया महासंघाच्या मार्फत वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करत आहेत .

हनुमंताने तुम्हाला ही बुद्धी दिली
ज्या मैदानात अनेक प्रकारच्या केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या त्या खासबाग मैदानाच्या नावाने मैदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच खासबाग केसरी कुस्ती मैदान होत आहे यापूर्वी तालीम संघ असेल किंवा जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात काम करणाऱ्या आम्हा लोकांना कधीच हे सुचले नाही तुम्हाला ही हनुमंतानेच बुद्धी दिली असेल . खरच खासबाग केसरी हे ऐकून नवल वाटले व तितकाच अभिमानाने उर भरून आला आहे . कुस्ती क्षेत्राला आनंद आणि प्रेरणा देणारे काम तुम्ही करत आहात
हिंदकेसरी दिनानाथ सिंह

Advertisement
Tags :

.